मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ डिसेंबर २०२४
९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडून तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप गट) अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना संमेलन उद्घाटनासाठी निमंत्रणाचे पत्र पाठवण्यात आले आहे.
नवी दिल्लीमध्ये सन १९५४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची पुनरावृत्ती फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडून तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप गट) अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना संमेलन उद्घाटनासाठी निमंत्रणाचे पत्र पाठवण्यात आले आहे.
तालकटोरा येथे २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात येईल, असा अंदाज आहे. त्यासाठी २१ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण मोदींना देण्यात आले आहे. २१ फेब्रुवारीला शक्य नसल्यास २० फेब्रुवारीच्या संध्याकाळी वेळ राखून ठेवावा, अशीही विनंती पत्राद्वारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, संमेलनाचे संयोजक सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी केली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनीही मराठी साहित्य संमेलनाची परंपरा नमूद करत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोदी यांनी करावे, अशी विनंती केली आहे.
यामध्ये नवी दिल्लीतील ३७व्या संमेलनाचा संदर्भही देण्यात आला आहे. ३७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी केले होते. त्यावेळी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते, तर संमेलनाध्यक्ष तकतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन व्हावे हे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याला साजेसे ठरेल, असेही पवार यांनी पत्रात म्हटले आहे.