कल्याण प्रतिनिधी :
दि. २१ डिसेंबर २०२४
घरात धूप लावून धूर केल्याचा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यांना गुंडामार्फत लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. मराठी रहिवाशांना मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला याच्याविरोधात सोसायटीमधील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेत शुक्लाला अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, विधानसभेत शुक्रवारी या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर शरण आलेल्या अखिलेश शुक्लाला पोलिसांनी अटक केली.
अखिलेश शुक्ला हा आयएएस अधिकारी असल्याचे सांगून स्थानिक रहिवाशांना धमकावत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. शुक्लाच्या खासगी गाडीत अंबर रंगाचा दिवा होता. मात्र, त्याचा हाच रुबाब उतरवत कल्याण खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्लाची खासगी गाडी जप्त केली. या गाडीमधून अंबर दिवाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
दुसरीकडे, कल्याण आरटीओने अखिलेश शुक्ला वापरत असलेल्या गाडीला साडेनऊ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. कोणताही अधिकार नसताना गाडीवर अंबर दिवा वापरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने अखिलेश शुक्लाची खासगी गाडी ताब्यात घेतली. इन्शुरन्स आणि पीयूसी संपूनही त्याची गाडी चार वर्ष वापरात असल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी या रहिवाशांसह शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस उपायुक्तांची भेट घेत शुक्लाला अटक करण्याची मागणी केली. यानंतर काही वेळातच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीदेखील पोलिसांची भेट घेत त्याच्या अटकेची मागणी केली. या प्रकरणाचा तपास कल्याणचे सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अखिलेश शुक्लाने पोलिसांच्या ताब्यात गेल्यावर मराठी कुटुंबावर उलट आरोप केल्याने, कल्याणमधील राड्याला वेगळं वळण लागलं आहे.
कल्याण पश्चिमेकडील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये राहणाऱ्या अखिलेश शुक्लाने शेजाऱ्यांशी झालेल्या वादातून बाहेरून गुंड आणत अभिजित देशमुख, विजय कळविकटे, धीरज देशमुख यांना लोखंडी रॉडने मारहाण केली होती. शेजाऱ्यांकडून माझ्या पत्नीला वर्षभरापासून त्रास दिला जात असून मी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राहात असल्याने स्वत:ला महाराष्ट्रीयच समजतो, अशी पोस्ट शुक्लाने केली आहे.