पुणे प्रतिनिधी :
दि. २१ डिसेंबर २०२४
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीवर टीका होत असून, भुजबळांनीही नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे खासदाराने भुजबळांवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्ये येण्याबाबत भाष्य केलं आहे.
पुणे : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे महायुतीवर सर्वत्र टीका होत आहे. स्वतः छगन भुजबळ यांनीही जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता विरोधी पक्षातील नेतेही प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
छगन भुजबळांवर त्यांच्या पक्षाने अन्याय केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी आज व्यक्त केली. तसेच, ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली भूमिका मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, याबाबत व्यक्तिशः मत व्यक्त करण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विषयावरील अधिकृत भूमिकेबाबत अद्यापही स्पष्टता नाही. भुजबळ साहेब जे पोटात ते ओठात. माझा त्यांच्याशी कुठलाही संपर्क नाही त्यावर मी का बोलायचं. आलेच तर स्वागत असल्याचं निलेश लंके म्हणाले.
महाराष्ट्रातील बीड आणि परभणी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनांबद्दल राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार बीड येथे संतोष देशमुख कुटुंबीयांची, तर परभणी येथे सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यांच्या सोबत खासदार निलेश लंकेही दौऱ्यात सहभागी आहेत. पुण्यातून आज सकाळी शरद पवार आणि निलेश लंके बीडकडे रवाना झाले.
“बीडमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणात मी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. आरोपींचा प्रत्यक्ष संबंध असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. इतके दिवस उलटले, तरी सरकारने ठोस पावले उचललेली नाहीत, यावरून त्यांच्या कार्यशैलीची दिशा लक्षात येते. पोलिसांनीही ठोस पाऊल उचलले नाही, ही खेदजनक गोष्ट आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” असे लंके म्हणाले.