मुंबई प्रतिनिधी :
दि. ३१ डिसेंबर २०२४
राजकारणात सर्वाधिक काळ युती राहिलीय ती शिवसेना-भाजपची. आता शिवसेनेतील फुटीमुळे राजकीय समीकरण बदलले असले तरी भाजपची एका गटाशी युती मात्र कायम आहे. यातच ठाकरे पुत्राने गंभीर मुद्द्याची नस पकडत पुन्हा भाजपशी सलगी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहत गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाकाय होर्डिंग्स आणि बॅनर्सबाबत एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना एक आवाहन केले आहे. राज्यातील वाढत्या पोस्टर, बॅनर- होर्डिंगच्या मुद्द्याची नस पकडत त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर यावर बंदी घालण्याबाबत त्यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे.
आदित्य ठाकरेंनी पत्रात ‘२०२५ मध्ये पदार्पण करताना तसेच लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जबाबत प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्वाचा निर्णय घेऊ शकता,’ असे मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे.
ठाकरे पुढे लिहितात, “एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा सर्वांनाच त्रास होतो आहे. गेल्या दोन वर्षांत बीएमसीकडून निवडक पोस्टर हटवण्यात आली, तर सत्ताधारी पक्षांची पोस्टर मात्र तशीच दिसत आहेत. मी आपल्याला विनंती करतो की, या दिशेने आपण पहिले पाऊल टाकल्यास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी या गोष्टींवर आपण एकत्र काम केले पाहिजे. आपण याविषयी बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी आणि माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राही”, असे मोठे विधान आदित्य ठाकरेंनी केले आहे.