डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ३१ डिसेंबर २०२४
भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला असून, त्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. हा पुतळा समुद्रसपाटीपासून 14,300 फूट उंचीवर सीमेवरील पँगॉन्ग तलावाच्या काठावर उभारण्यात आला आहे. तेथे भगवा ध्वजही फडकवण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या 14 कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांनी 26 डिसेंबर रोजी या पुतळ्याचे अनावरण केले. याचा व्हिडिओ लष्कराने जारी केला आहे.
भारत आणि चीनने लडाख सीमेवरील डेमचोक आणि डेपसांग भागातून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. 5 मे 2020 रोजी पूर्व लडाखमधील पँगॉन्ग लेक परिसरात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती.