पुणे प्रतिनिधी :
दि. ०९ जानेवारी २०२५
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. गंभीर आरोप केले जात आहेत. अनेक ठिकाणी मोर्चाचे आयोजन केलं जातंय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात पहिला मोर्चा हा बीडमध्ये काढला गेला. त्यानंतर सतत मोर्चे निघताना दिसत आहेत. बीडच्या मोर्चात अनेक मोठे नेते दाखल झाले. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासोबतच या हत्येचा मास्टरमाईंट हा कराडच असल्याचे सांगितले जातेय.
सुरेश धस यांच्याकडून या प्रकरणी गंभीर आरोप केले जात आहेत. अगोदर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना सुरेश धस दिसले. त्यानंतर आता त्यांच्या निशाण्यावर थेट राष्ट्रवादीच असल्याचे बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच सुरेश धस यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने विविध चर्चा या रंगताना दिसल्या. मात्र, आपण वेगळ्या कारणामुळे अजित दादांची भेट घेतल्याचे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
सुरेश धस यांनी म्हटले होते की, राष्ट्रवादीमध्ये मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये. मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहितीये आणि मुन्नीला माहिती आहे, मी कोणाबद्दल बोलत आहे. सुरेश धसांच्या या विधानानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या. आता सुरेश धस यांच्या या मुन्नीच्या विधानावर अजित पवार हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळाले.
अजित पवार यांना विचारण्यात आले की, सुरेश धस यांनी बडी मुन्नी म्हणून काही आरोप केले आहेत. त्यावर बोलताना संतापून अजित पवार हे म्हणाले की, ते त्यांना विचारा…हे असल्या फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावे घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा…कोण आहे ते…सुरेश धस यांच्यावर अजित पवार हे संतापलेले दिसले. राष्ट्रवादीमध्ये एक बडी मुन्नी आहे आणि तिने समोर यावे, असे सुरेश धस यांनी म्हटले होते.