छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :
दि. ११ जानेवारी २०२५
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. सातत्याने अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. हेच नाहीतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून केली जातेय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक ठिकाणी मोर्चाचे आयोजन केले जात आहे. सुरेश धस यांच्याकडून गंभीर आरोप करत मोठे खुलासे केले जात आहेत. दुसरीकडे ओबीसी समाज हा सुरेश धस यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झालाय. अनेक ठिकाणी सुरेश धस यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत.
काल सुरेश धस यांनी म्हटले होते, “राष्ट्रवादीमध्ये एक मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणावं तू इथे ये. कुठे मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहितीये आणि मुन्नीला पण माहितीये मी कोणाबद्दल बोलत आहे”. सुरेश धस यांच्या या विधानानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. अखेर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण? यावर चर्चा रंगताना दिसली.
आता सुरेश धस यांनी याबद्दल भाष्य केले आहे. सुरेश धस हे म्हणाले की, मी काल ज्या मुन्नीबद्दल बोललो ती कोणीही महिला नसून तो पुरूष आहे. सुरेश धस यांच्या विधानानंतर सर्वांना वाटले की, ते एका महिलेबद्दल बोलत आहेत. मात्र, त्यांच्याकडून आता स्पष्ट करण्यात आले की, ती महिला नाही. मग सुरेश धस नेमके कोणाबद्दल बोलत आहेत, याची चर्चा होताना दिसत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस हे सातत्याने गंभीर आरोप करताना दिसत आहेत. आज झालेल्या पैठण येथील मोर्चात ते बोलताना दिसले. सुरेश धस यांच्या निशाण्यावर धनंजय मुंडे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते की, मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचे गांभीर्य कमी झाले. सुरेश धस या हत्येचे फक्त राजकारण करत आहेत.