‘हनी ट्रॅप’
आज ब-याच ठिकाणी आपण ऐकतो की ‘हनी ट्रॅप’ च्या माध्यमातून तरुणांना लुटले, ‘हनी ट्रॅप’मध्ये या राजकीय नेत्याला अडकावले, बिझनेसमनला ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून लाखोंचा गंडा घातला. तर, अनेकांना हा प्रश्न पडला आहे की हे ‘हनी ट्रॅप’ म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे, त्यातून कशी फसवणूक केली जाऊ शकते, ‘हनी ट्रॅप’ कसा रचला जातो व एखादा व्यक्ती त्या ‘हनी ट्रॅप’ला कसा बळी पडू शकतो. या सर्व प्रश्नांचा इथ ऊहापोह करुयात. ‘हनी ट्रॅप’ हा जेवढा सहज सोप्पा वाटावा तेवढाच अवघड विषय सुद्धा आहे.
‘हनी ट्रॅप’ म्हणजे नेमकं काय.?
मोहात पाडू शकणाऱ्या किंवा आकर्षक व्यक्तींचा (आकर्षक महिला) वापर करून एखाद्याला अलगद जाळ्यात अडकवणे व विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याच्या पद्धतीला ‘हनी ट्रॅप’ म्हणतात. ‘हनी ट्रॅप’ म्हणजे एखाद्या व्यक्तीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, त्याच्याशी भावनिक आणि शारीरिक संबंध निर्माण करुन त्याची गोपनीय माहिती काढणे, ती दुस-या व्यक्तीला देणं किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापरणं,समोरच्याला ब्लॅकमेल करणं आणि पैसे मिळवणं इत्यादीसाठी त्याचा वापर केला जाते. ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकलेल्या व्यक्तींकडून पैसे घेणे किंवा एखादे काम करुन घेणे हा यामागचा खरा उद्धेश असतो. ऑनलाईन माध्यमांचा वापर करुन फसवणूक केली जाते.
कशी चालते, ‘हनी ट्रॅप’ची कार्यपद्धती.
राजकारण, प्रशासन, फॅशन, मनोरंजन, क्रिडा, गुप्तचर यंत्रणा, लष्कर व कॅार्पोरेट आदी क्षेत्रात ‘हनी ट्रॅप’ या पद्धतीचा वापर करुन कामे करुन घेतली जातात किंवा पैसे उकळले जातात. या मध्ये जास्तीत पणे महिलांचा वापर केला जातो.
राजकारणी, बिझनेस किंवा कॅार्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींकडे बक्कळ पैसा असतो. तेंव्हा, ज्याची शिकार करायची आहे, त्याच्याकडे कामानिमित्त एखादी महिला, मुलगी किंवा मॅाडेल पाठवून त्याला सर्वप्रथम फुस लावायची. त्यानंतर त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे. त्या व्यक्तीशी ओळख वाढवायची, ओळखीचे रुपांतर मैत्रीत करायचे. त्यातून फोनवर संपर्क करणे, मोबाईल, व्हाट्सअप सारख्या चॅटच्या माध्यमातून चॅटिंग करायचे, अनेकदा प्रत्यक्ष भेटीगोठी घेणे, लैंगिक गोष्टींना आमत्रंण देणे किंवा तसे प्रसंग समोर च्या व्यक्तीला करायला भाग पाडणे. त्या सर्व भेटीचे, फोनवर बोलल्याचं फोन रेकॅार्डिंग व चॅटिंगचे स्क्रिनशॅाट काढून ठेवायचे. त्यानंतर त्या व्यक्तीला पैशांची मागणी करायची किंवा आपल्या संबधित फाईलचे काम करुन घ्यायचे. पैसे दिले नाहीत किंवा हवं ते काम नाही केलं तर हे व्हिडिओ, रेकॅार्डिंग, चॅटिंग आणि फोटो व्हायरल करायची धमकी दिली जाते. शेवटी, तो व्यक्ती त्या महिलेला शरण येतो किंवा मग तेथून पुढे त्याचा आर्थिक व मानसिक त्रास सुरु होते. अशी सर्वसाधारण ‘हनी ट्रॅप’ची कार्यपद्धती चालते.
सर्वसामान्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याची कार्यपद्धती.
‘हनी ट्रॅप’ मध्ये अनेक गोष्टींचा वापर केला. महिला फेसबूकच्या माध्यमातून फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवितात. त्यातून पुढे समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग सुरु करते, ओळख वाढविते. त्यानंतर त्या व्यक्तीस व्हिडिओ कॅाल्स करुन न्युड दाखवितात. मग, समोरच्याला ही न्युड व्हायला सांगून त्याचे शुटिंग किंवा फोटो काढले जातात. मग,हे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल करायची धमकी दिले जाते. त्यातून मग, सेटिंग करायची पैसे घ्यायचे अशी एक पद्धत वापरली जाते.
किंवा एखाद्या व्यक्तीला महिलेचा मिसकॅाल जातो. मग,तो व्यक्ती त्या अनोळखी नंबरला कॅाल करुन संपर्क करतो. समोरुन महिला बोलत असल्याने तोही खुलून तिच्याशी बोलू लागतो. त्यानंतर चॅटिंग व कॅालिंग सुरु होते.त्यातून ही पुढे मग, व्हिडिओ व फोटो काढून पैशांची मागणी केले. मग, तो व्यक्ती पैसे देतोय तो पर्यंत पैसे उकळले जातात.
अनेकदा फोन किंवा सोशल मिडियावर ओळखी वाढवून या महिला किंवा मुली प्रत्यक्ष त्या व्यक्तीला हॅाटेल वर भेटायला बोलवितात. त्यासोबत पार्टी व बाकी मौजमज्जा वगैरे करतात. त्यानंतर कोणी तरी तिसरीच व्यक्ती तिथे येते व त्या महिलेसोबत असलेल्या व्यक्तीला धमकी देते, मारहाण करते. त्यानंतर हे प्रकरण व्हायरल केले जाईल, पोलिस स्टेशन मध्ये बलात्काचा गुन्हा दाखल केला जाईल अशा धमक्या दिल्या जातात. शेवटी, घाबरुन जाऊन पिडित व्यक्ती त्या व्यक्तींच्या पैशांची मागणी पुर्ण करतो.
एखाद्याला खोट्या प्रेमात अडकवून लॅाजवर बोलविलं जातं. तिथे काही व्यक्ती ठरवून येतात आणि त्या महिलेसोबत खोट्या प्रेमात अडकलेल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवितात. त्याची लुबाडणूक करतात.
या शिवाय ही अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ‘हनी ट्रॅप’ लावून व्यक्तीची लुबाडणूक केली जाते किंवा मानकिस त्रास दिला जातो. अगदी, या मध्ये महिला सेक्स सारख्या गोष्टी करुन ही समोरच्याला अलगद जाळ्यात ओढतात.
कशी असते, ‘हनी ट्रॅप’ची टिम.
‘हनी ट्रॅप’ रचण्यात, त्यातून पुढे पैसे उकळणे, धमक्या देणे या सर्व कार्यपद्धतीत फक्त एकटी महिलाच असते असे नाही. तर, यामध्ये अनेक पुरुष मंडळी व एक पेक्षा जास्त महिलांचा सुद्धा सहभाग असतो. विशेष करुन आजकाल ग्रामीण भागात वेगवेगळ्या संघटनांच्या नावाने महिला व पुरुष एकत्रित येतात. मग बकरा ठरवून एखाद्याला समोरुन पैसे घेऊन बदनाम केले जाते, एखाद्याचे सार्वजनिक जीवन उद्धव्स्त केले जाते, पैशांची लुबाडणूक केली जाते. तेंव्हा, ‘हनी ट्रॅप’चे संघटीत पणे ठरवून कट रचले जातात. थोडक्यात, अनेक महिला आणि पुरुष ‘हनी ट्रॅप’ची टिम म्हणून काम करीत असतात. ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून मिळालेल्या पैशांची हे सर्वजण विभागणी करुन घेतात.
‘हनी ट्रॅप’मध्ये अडकू नये म्हणून आपण काय दक्षता घ्यायला हवी.
-सोशल मिडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना जागरुक राहणे.
-शक्यतो महिलांच्या फ्रेंन्ड रिक्वेस्ट अॅड करताना विचार करावा.
-सोशल मिडियावर सहज ओळखी झालेल्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घ्यावी.
-सहज कोणत्याही महिलेशी पटकन चॅटिंग किंवा व्हिडिओ कॅाल्सच्या भानगडीत पडू नये.
-नवीन ओळख झालेल्या व्यक्तीशी चॅटिंग किंवा फोन द्वारे बोलताना समोरच्याने कितीही लैगिंक उत्तेजित करायचा प्रयत्न केला तर लैगिंक भावनांना आवर घालून संवाद करावा.
-न्युड फोटो किंवा व्हिडिओ कॅाल्सची मागणी केल्यास तात्काळ नकार द्यावा.
-अनोळखी फोन कॅाल्स विषयी जागरुक रहावे.
-अनोळखी महिलेचा फोन आल्यावर समोरुन किती ही वश केले तर पाघळून जाऊ नये.
-नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीला भेटायला जाताना, सावधानतेने विचार करावा.
-सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी विशेषतः महिलांशी बोलताना ताईने सुरुवात करावी.
-समोरची व्यक्ती जास्त लगट करीत असल्याचे जाणवल्यास तात्काळ सावध व्हावे.
-फोनवर बोलताना व चॅटिंग करताना हे सर्व रेकॅार्डिंग होते याचा कायम विचार डोक्यात ठेवावा.
– अधिकारी, बिझनेसमन व राजकीय नेते यांनी महिलांशी चार हात राखूनच संपर्क ठेवावा.
‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकलेल्या व्यक्तींनी कसे बाहेर पडावे व काय करावे.
आपण ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकलो आहोत याची जाणीव होताच, ती गोष्ट न लाजता आपल्या जवळच्या मित्राला सांगणे. त्यानंतर जवळच्या वकिलाशी सविस्तर चर्चा करणे आणि शेवटी, पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देणे. तरच, तूम्ही या ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यातून सुटू शकता.
म्हणूनच, “वो बुलाती है, मगर जाने का नही.”