मुंबई प्रतिनिधी :
दि. १८ जानेवारी २०२५
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता चाकू हल्ला झाला. या धक्कादायक घटनेनंतर महाराष्ट्रातील सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांकडून महायुती सरकारवर निशाणा साधला जात आहे. आता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं, की या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. याबाबतची माहितीही पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांना अनेक सुगावे लागले असून मला वाटतं पोलीस लवकरच या प्रकरणाचा छडा लावतील.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याने अभिनेत्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेत्यावर चोरट्याने धारदार शस्त्राने अनेक वार केले. यात अभिनेता गंभीर जखमी झाला होता. चोराने सैफच्या छातीवर, मानेवर, हातावर सहा वेळा हल्ला केला. मध्यरात्री सैफला तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची तब्येत बरी असून तो धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
सैफवर हल्ला केलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या क्राईमच्या १० टीम सज्ज करण्यात आल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. तसंच सैफ राहत असलेल्या इमारतीच्या पायऱ्यांवरुन आरोपी उतरताना सीसीटीव्ही कॅमेरामध्येही कैद झाला आहे. या फुटेजवरुन पोलिसांचा पुढील तपास सुरू असून सैफकडे काम करणाऱ्यांकडे याप्रकरणी चौकशी केली जात आहे.