मुंबई प्रतिनिधी :
दि. १८ जानेवारी २०२५
बॉलिवूड नवाब सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. सैफच्या घरात घुसून त्याच्यावर बुधवारी रात्री चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला आहे. त्याला मध्यरात्री तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वांद्रे येथील त्याच्या इमारतीतील १२ व्या मजल्यावर राहत्या घरी आरोपीने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मानेवर, पाठीवर, हातावर खोल जखमा झाल्या. बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अभिनेता सैफ अली खानच्या जनसंपर्क प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ आणि करिनाच्या घरी बुधवारी रात्री अडीच वाजता चोरीचा प्रयत्न करण्यात आला. त्यात सैफवर चाकू हल्ला झाला. या हल्ल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. आम्ही मीडिया आणि त्याच्या चाहत्यांना संयम बाळगण्याची विनंती करत आहोत. सध्या याप्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे, असे ते म्हणाले.
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्याकडून तपास
या घटनेनंतर, सैफ अली खानच्या घरी तपासासाठी मुंबई पोलीस पोहोचलेले दिसले. मुंबई पोलिसांच्या टीममध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या संपूर्ण टीमसोबत दिसले. मात्र त्यांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र दया नायक या प्रकरणात तपास करत असल्याने योग्य ती कारवाई केली जाईल, तसंच आरोपीला ताब्यात घेतलं जाईल असं बोललं जात आहे. आरोपीवर ३११, ३१२, ३३१(६), ३३१(७), ३३१(४) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे आहेत दया नायक –
दया नायक हे मुंबईचे पोलीस अधिकारी आहेत. ते ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाताता. ते १९९५ मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून पोलीस दलात दाखल झाले आणि १९९६ मध्ये जुहू पोलीस स्टेशनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. दया नायक यांनी ८० हून अधिक गुन्हेगारांना चकमकीत ठार केलं असल्याची माहिती आहे. ते सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातही ते मुंबई पोलिस अधिकाऱ्यांसोबत दिसले होते.