प्रयागराज प्रतिनिधी :
दि. २२ जानेवारी २०२५
मोनालिसाला प्रसिद्धी मिळाली असली तरी ही प्रसिद्धीच तिच्या पोटावर उठली आहे. (फोटो सौजन्य : मोनालिसा भोसले/इन्स्टाग्राम)
उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे २०२५ चा महाकुंभ मेळा चालू आहे. दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. पण हा पूर्ण महाकुंभ मेळा असल्याने भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. हा कुंभमेळा १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दरम्यान, या महाकुंभ मेळ्यात माळा विकणारी सुंदर मुलगी समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या मुलीचं नाव मोनालिसा भोसले असं आहे. मोनालिसा मुळची मध्य प्रदेशमधील इंदूरची रहिवासी आहे. देखणं रुप आणि समाजमाध्यमांवर मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. मात्र,मोनालिसाला आता या लोकांचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला इंदूरला पाठवलं आहे. महाकुंभ मेळ्यात माळांची विक्री होत नसून लोकांकडून मानसिक त्रास होत असल्याचं तिनं स्वतःच सांगितलं आहे.
सुंदर डोळे आणि रेखीव चेहऱ्यामुळे मोनालिसाला प्रसिद्धी मिळाली असली तरी ही प्रसिद्धीच तिच्या पोटावर उठली आहे. या प्रसिद्धीमुळे तिला महाकुंभ मेळा सोडून घरी जाणं भाग पडलं आहे. तसेच तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेसाठी तिला एका साधूच्या शिबिरात आश्रय घ्यावा लागला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार-पाच दिवसांपासून मोनालिसा घरातून बाहेर पडली की तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. अनेकजण तिच्याशी जबरदस्ती बोलण्याचा, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांनी तिला महाकुंभ मेळ्यातून उचलून नेण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबाला तिची काळजी वाटू लागली आहे. परिणामी तिला महाकुंभ मेळा सोडून जावं लागलं.