डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २३ जानेवारी २०२५
बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात टाकलेल्या छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. बेतिया जिल्हा शिक्षण अधिकारी (DEO) रजनीकांत प्रवीण यांच्या निवासस्थानावर बिहार दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत तब्बल दोन बेडभरून रोकड जप्त करण्यात आल्याने दक्षता विभागाचे अधिकारीही अवाक झाले आहेत. या नोटा मोजण्यासाठी एक मशीनही मागवण्यात आले आहे.
सकाळपासून कारवाई सुरु
बेतिया येथील मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील बसंत बिहार कॉलनीत जिल्हा शिक्षण अधिकारी (DEO) रजनीकांत प्रवीण यांचे घर आहे. पाटण्यातील दक्षता पथकाने आज सकाळी निवासस्थानावर छापा टाकला. या कारवाई दरम्यान कोणालाही आत जाण्याची किंवा बाहेर येण्याची परवानगी नाही. स्थानिक प्रशासन आणि दक्षता विभागाचे अधिकारी सध्या या प्रकरणावर बोलणे टाळत आहेत.
पैसे मोजण्याचे मशीन मागवले
डीईओ रजनीकांत प्रवीण गेल्या तीन वर्षांपासून बेतिया येथे तैनात आहेत. दक्षता पथक अनेक तासांपासून त्याच्या घरी उपस्थित आहेत. त्याची चौकशी केली जात आहे. घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तब्बल दोन बेड नोटा असल्याने त्या मोजण्यासाठी यंत्र मागवावे लागले. दक्षता पथकाने जिल्हा शिक्षणाधिकारी (डीईओ) च्या अन्य मालमत्तेवरही छापे टाकले आहेत.