बीड प्रतिनिधी :
दि. २४ जानेवारी २०२५
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण धसास लावणार्या सुरेश धस यांच्यावरच एका पीडित युवतीने गंभीर आरोप केला आहे. या युवतीवर तुषार संतोष कोकणे या आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केले, गैरफायदा घेतला असे पीडित युवतीचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, या युवतीच्या म्हणण्यानुसार, या आरोपीने, आपण सुरेश धस यांचे नातेवाईक असल्याचे या युवतीला सांगून तिचा गैरफायदा घेतला. तिच्यावर दबाव टाकला. यानंतर युवतीने त्याच्याविरुद्ध तक्रार केल्यावर त्याला अटक करण्यात आली. सेशन कोर्टाने त्याचा जामीन नामंजूर केला. यानंतर त्याने हाय कोर्टात अपील केले. त्यावेळेस पोलिस अधिकार्यांनीही या युवतीची दिशाभूल करून तिला हियरिंग पासून दूर ठेवले. यासाठी तिच्या खोट्या कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. नंतर हियरिंग कॅन्सल झाल्याचे सांगून तिला पुढल्या वेळेस येण्यास सांगितले.
आरोपीने युवतीला धस साहेबांचा नातेवाईक आहे असे सांगून तिलाच घाण घाण शिव्या दिल्याचा आरोपही या युवतीने केला आहे. आता न्याय मिळण्यासाठी ही युवती आमरण उपोषणासाठी बसली आहे, ‘मी व माझे कुटुंबिय दहशतीखाली असून, आम्हाला वारंवार धमक्या मिळत आहेत. आमदार सुरेश धस यांचे निकटवर्तीय असलेले आरोपी तुषार कोकणे व नितिन कोकणे तसेच त्यांच्या कुटुंबियांकडून मला मानसिक त्रास दिला जातो आहे. माझ्यावर खोटे गुन्हे ते दाखल करत आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी मला न्याय द्यावा’, असा बॅनर लावून ही युवती, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसली आहे.