पुणे प्रतिनिधी :
दि. २८ जानेवारी २०२५
पुणे या शहराची ओळख आयटी शहर म्हणून फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे. विविध राज्यातून अनेक तरुण पुण्यात नोकरीसाठी येत असतात. ज्या ठिकाणी कुठल्याही कंपनीने जर ओपन प्लेसमेंट ठेवले असेल तर त्या ठिकाणी या तरुणांची गर्दी होत असते. याच संदर्भातील एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत उभे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील मगरपट्टा या भागात असणाऱ्या एका नामांकित आयटी कंपनीने शनिवारी युवकांसाठी कॅम्पस ड्राईव्ह ठेवला होता. या ठिकाणी युवकांनी अक्षरशः तोबा गर्दी केली. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या ड्राइव्हला विविध जिल्ह्यातून राज्यातून आलेले तरुण मोठ्या रांगांमध्ये उभे असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
आयटी क्षेत्रातही बेरोजगारी?
पुण्यातील मगरपट्टा या ठिकाणी असलेल्या UPS लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अवघ्या 50 जागांसाठी जाहिरात दिली होती आणि त्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून जवळपास साडेपाच हजार आयटी इंजिनियर्स इंटरव्यू देण्यासाठी आले होते. काही लोक तर ही गर्दी बघून परत देखील निघून गेले. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर बेरोजगारीचं प्रमाण हळूहळू आयटी क्षेत्रात देखील येऊ लागलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
UPS कंपनी पुरवते बॅकेंड सर्व्हिस
दरम्यान, UPS ही कंपनी अमेरिकेतील असून इतर कंपन्यांना ही कंपनी बॅकेंड सर्व्हिस प्रोव्हाईड करते. बँकिंग सर्व्हिसमध्ये इतर कंपनींना लागणारा डेटा एन्ट्री करणे, कस्टमर सर्व्हिस सपोर्ट करणे, कस्टमरला योग्य ती सुविधा पुरवणे, असे या कंपनीचे काम आहे. विशेष म्हणजे या पोस्टसाठी तुम्हाला पदवीचे शिक्षण घेणं आवश्यक असताना काल झालेल्या मुलाखतीमध्ये अनेक जण आयटी क्षेत्रातले देखील तरुण-तरुणी या मुलाखतीसाठी आल्याचे दिसून आले.