बीड प्रतिनिधी :
दि. ०६ फेब्रुवारी २०२५
बीड जिल्ह्यातील आघाडीचे नेते धनंजय मुंडे हे सध्या खूप चर्चेत आले आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचेदेखील नाव आले. मात्र आता ते कोणत्याही राजकाणामुळे नाही तर कौटुंबिक वादामुळे चर्चेत आले आहेत. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप दाखल केला होता. या प्रकरणाची न्यायालयात चौकशीदेखील सुरु होती. या प्रकरणाचा निकाल आता समोर आला आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी केलेल्या घरगुती हिंसाचाराप्रकरणीच्या आरोपात वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवले आहे.
धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. याप्रकरणी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलं आहे. तसेच त्यांनी करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपयांची पोटगी देण्यात यावी असे आदेशदेखील दिले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.
काही वर्षांपूर्वी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा केला होता. गेली अनेक वर्ष या प्रकरणात दावा सुरु होता. तसेच याचवेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचाही आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी कौटुंबिक न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे मान्य केले. तसेच करुणा शर्मा यांना दरमहा पोटगी म्हणून दोन लाख रुपये देण्यात यावेत असेही सांगीतले.
दरम्यान याप्रकरणी धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी केलेले आरोपी कोर्टाकडून अंशत: मान्य करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत वाट बघावी, असं कोर्टाने म्हटलं आहे . मुंडेंनी करुणा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी द्यावी आणि या खटल्याचा 25 हजारांचा खर्चही मुंडेंनी द्यावा, असेही आदेश कोर्टाने दिले आहेत.