पुणे प्रतिनिधी :
दि. १० फेबुवारी २०२५
शेतकऱ्याचा सखा म्हणजे बैल. पोटच्या मुलाप्रमाणे शेतकरी बैलाला जीव लावत असतो. कुटुंबातील सदस्यांनी लावलेला लळा, माया, ममता, वात्सल्य अनेकदा अनुभवास आलेले आहे. अशाच एका शेतकरी कुटुंबात रुबाबात वाढलेल्या बनश्या बैलाचा ३१ जानेवारीला मृत्यू झाला होता. त्या बनश्या बैलाचे ऋण फेडण्यासाठी जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील शेतकरी बनू बाळाजी बोडके यांनी बनश्या बैलाचा नुकताच दशक्रिया विधी पार पाडला आहे. त्याच्या जाण्याने शेतकऱ्याने शोक व्यक्त करत माझ्या घरातील महत्वाचा घटक गेल्याची भावना देखील व्यक्त केली.
जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील बनू बाळाजी बोडके यांच्या घरात आला होता. बोडके कुटुंब हे बनश्या ग्रुप बैलगाडा संघटना या नावे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यांच्या ग्रुपमधील बनश्या नावाचा बैल बोडके कुटुंबाचा सदस्य होता. हिंद केसरी म्हणून बनश्या बैलाने ६ ते ७ वर्षे अनेक गावांचे घाट गाजविल्याचा इतिहास आहे. त्याने शेतकऱ्यांची व बैलगाडा रसिक प्रेक्षकांची मने जिंकून उत्तर पुणे आणि नगर जिल्ह्यात नाव कमावले आहे. या दोन्ही जिल्ह्यांत मोठ मोठ्या घाटांमध्ये हिंदकेसरी बनश्याने शर्यती गाजवल्या व त्या जिंकून बोडके कुटुंबाचा व खामुंडी गावाचा नावलौकिक वाढवला.
घाटातील शर्यतीत पळताना या बनश्याने अनेक तरुण खोंडांना शिस्तीने पळणे शिकवले. नवीन खोंडांना शिकवताना त्याने स्वतः चे काही नियम घालून घेतले होते. बैलगाडा शर्यतीत गाड्याला पळताना त्याला कोणीही पकडले तरी चालायचे, परंतु शर्यत खेळून पुन्हा गोठ्यात आल्यानंतर कुटुंबातील ठराविकच लोक बनश्याला पकडू शकत होते. तो दुसऱ्याला हात लावू देत नसे. हिंदकेसरी बनश्याचा रुबाबदार देह व दिमाखदार चाल पाहूनच त्याच्यातील वेगळेपण स्पष्ट जाणवत होते. खामुंडी येथील सुरेश, जालिंदर व दिलीप बोडके त्याचप्रमाणे महेंद्र बोडके आणी ऋषिकेश बोडके, अभिषेक बोडके या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने बनश्या वर जीवापाड प्रेम केले. त्याच्या कामगिरीने अनेक गाडा मालकांनी बनश्याला विकत घेण्यासाठी दहा ते अकरा लाखांपर्यंत बोली लावली होती. पण घरचा सगळ्यांचा लाडका बनश्या बोडके परिवाराने विकला नाही. बनश्याने अनेक घाटांमध्ये कुटुंबाचे, गावचे व तालुक्याचे नाव मोठे केले. अशा हिंदकेसरी बनश्याने ३१ जानेवारीला जगाचा निरोप घेतला.
रविवारी ९ तारखेला बनश्याचा दशक्रिया विधी दुःखित अंतकरणाने पार पडला. बनश्याची उणीव येथून पुढे प्रत्येक घाटात भासणार असून त्याची आठवण नक्कीच सर्वांना जाणवेल अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या आहेत.