रायगड प्रतिनिधी :
दि. १० फेब्रुवारी २०२५
विधानसभा निवडणुकीनंतर कोकणातही ठाकरे गटाला मोठा दणका देण्याची तयारी महायुतीचे नेते करत आहेत. ठाकरे गटाच्या रायगड जिल्ह्यात महाडच्या माजी नगराध्यक्ष व गोगावले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगताप या महायुतीत जातील अशी चर्चा गेली अनेक दिवस सुरू आहे. पोलादपूर येथे क्षत्रिय मराठा पतसंस्थेच्या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले, भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि स्नेहल जगताप हे तीनही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी गोगावले यांनी स्नेहल जगताप यांच्या महायुतीतील प्रवेशाचे स्पष्ट संकेत देत मोठ विधान केलं आहे. गोगावले म्हणाले की, विधानसभा मतमोजणीच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्या ताई आज व्यासपिठावर आहेत याचा आनंद असून त्यांना तुम्ही घेतले काय किंवा त्या आमच्याकडे आल्या काय, एकच महायुती आहे. त्यांना कोणाकडे जायचे आहे त्यांनी ठरवावे असं मिश्किल स्वरूपात मोठे विधान करत त्यांनी स्नेहल जगताप यांच्या महायुतीतील प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. क्षत्रिय मराठा पतसंस्थेमार्फत पोलादपूर शाखेच्या कार्यक्रमावेळी हे तीनही नेते एकाच व्यासपीठावर आले होते.
गोगावले पुढे म्हणाले की, कोतवालसारख्या दुर्गम भागातील आपले सुपुत्र आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना विधानपरिषदेत तडफेने आणि मुद्देसूद भाषण करताना पाहिले आहे. क्षत्रिय मराठा ही पतसंस्था वर्ष-दोन वर्षात उंचीवर गेलेली दिसेल. आ.दरेकर यांनी हिम्मत दाखवून आपल्या मातीतील लोकांसाठी ही पतसंस्था आणली आहे. पुढील दहा वर्षानंतर या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. यासाठी जे काही सहकार्य लागेल ते निश्चित करू, अशी ग्वाही दिली. देशावर कर्जबाजारीपणामुळे जशा आत्महत्या होतात तशा कोकणात होत नाही. अडचणीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत. येथे मुलांना खेळण्यासाठी खेळाचे मैदान, आयुर्वेदिक महाविद्यालय उपलब्ध करून देणार आहोत. जेजे काही चांगले करायचे आहे ते नक्कीच करणार, फक्त तुमची साथ आवश्यक असं त्यांनी यावेळी सांगितल.
भाजप गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. दरेकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये पुढे, क्षत्रिय मराठा को-ऑप. पतसंस्था स्वातंत्र्यापूर्वीची आहे. कोकणातून आलेल्या लोकांनी मुंबईत ही पतसंस्था सुरू केली. 25 वर्षांपूर्वी ज्या पतसंस्था स्थापन झाल्या त्यांनी 25 हजार कोटींचा टप्पा पार केला. परंतु ही पतसंस्था एकही शाखा काढू शकली नाही. राजेश येरूणकरांनी अध्यक्षपद घेतल्यानंतर मी त्यांच्याकडून बॅलन्सशीट मागितली असता पतसंस्थेचे कामकाज सुधारण्याची आवश्यकता दिसून आल्याने त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले. गेल्या सहा महिन्यात या पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचे उदघाटन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोकं मुंबईत एकत्रित येऊन पतसंस्था हजारो कोटींवर नेत असतील तर कोकणातील जनतेला हे का जमत नाही?या इच्छाशक्तीपोटी हा विचार पूर्णत्वास नेला आहे.
आ.दरेकर हे आपल्या भाषणात म्हणाले,मंत्री भरत गोगावले यांच्याकडे फलोत्पादन खाते आहे. कोकण रेल्वेचे जे थांबे आहेत तेथे भाजीपाला, फळांचे स्टॉल उभे केले तर चाकरमानी ते खरेदी करू शकतील व या स्टॉलच्या माध्यमातून येथील बेरोजगार तरुणांना रोजगारही मिळेल, त्यादृष्टीनेही प्रयत्न व्हायला पाहिजेत,अशी अपेक्षा व्यक्त केली.