सोलापूर प्रतिनिधी :
दि. १० फेब्रुवारी २०२५
अभिनेता राहुल सोलापूरकर याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर आंबेडकरप्रेमी जनतेकडून संताप व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी राहुल सोलापूरकरच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूरकरचे तोंड फोडा, मी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतो, अशी घोषणा कोळींनी केली.
अभिनेता राहुल सोलापूरकर गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्य्राहून सुटका आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी राहुल सोलापूरकर याने केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. दोन्ही वक्तव्यांबाबत त्याने दिलगिरीही व्यक्त केलेली आहे, मात्र तरीही हा वाद शमलेला नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरला फोडून काढा. राहुल सोलापूर जिथे दिसेल तिथे त्याचे तोंड चपलेने रंगवणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस मी जाहीर करत आहे, अशी घोषणा कोळींनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसीन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचे. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण आहे. लोकांना गोष्टी रुपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावे लागते. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो, असे राहुल सोलापूरकर एका मुलाखतीत म्हणाला होता.
राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलाखतीत राहुल सोलापूरकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचं वक्तव्य केलं. वेदानुसार ते ब्राह्मणच आहेत, या त्याच्या वक्तव्यानंतर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत सोलापूरकरांना झोडण्याचा इशारा दिला आहे.