गडचिरोली प्रतिनिधी :
दि. १२ फेब्रुवारी २०२५
भामरागड तालुक्यात फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांचा तळ सी-60 च्या बहाद्दर जवानांनी उद्धवस्त केला. यावेळी झालेल्या कारवाईत पोलीस अंमलदार महेश कवडू नागुलवार यांना वीरमरण आलं. ही माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स मीडियावरून दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत पोलीस अंमलदार महेश कवडू नागुलवार हे हुतात्मा झाल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटलं,” महेश नागुलवार हे गडचिरोलीतील माओवाद्यांवरील कारवाईदरम्यान गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीनं हेलिकॉप्टरच्या मदतीनं एअरलिफ्ट करून गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रयत्नांची शर्थ करुनही त्यांना वीरमरण प्राप्त झालं.” अधिकारी हुतात्मा झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांशी फोनवर बोलले आहेत.
“महेश नागुलवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाराष्ट्र पोलीस दल आणि आम्ही सर्वजण नागुलवार यांच्या कुटुंबीयांसमवेत आहोत,” असे गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारची मदत आणि विविध लाभांसह २ कोटी रुपये अर्थसाहाय्य देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागुलवार यांच्या पार्थिवावर आज मूळ गाव मौजा अनकोडा ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
दिरंगी आणि फुलनार गावांमध्ये नक्षलवादी छावणी उभारल्याची माहिती मिळाल्यानंतर १८ सी-६० युनिट्स आणि सीआरपीएफच्या दोन क्यूएटी युनिट्सनं कारवाई सुरू केली होती. मंगळवारी सकाळी पोलिसांनी परिसराला वेढा घातला. त्यावेळी पोलिसांची नक्षलवाद्यांबरोबर दिवसभर चकमक सुरू राहिली. संयुक्त पथकानं कारवाई करून नक्षलवादी छावणी उद्ध्वस्त केली. तसेच अनेक वस्तू जप्त केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. गडचिरोली पोलिसांनी गेल्या काही महिन्यात दोन नवीन पोलीस मदत केंद्र सुरू केली आहेत. नुकतेच चार जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमपर्ण केलं. त्यांच्यावर ८२ गुन्ह्यांसह ३१ चकमकीत सहभाग घेतल्याचा आरोप आहे.
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात नक्षलवाद्यांवरील कारवायांबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं, “भारत सरकार मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाची समस्या संपवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. डाव्या विचारसरणीच्या नक्षलवदाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एक राष्ट्रीय धोरण तयार केलं आहे. या योजनांच्या अंमलबजावणीमुळे डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादात सातत्यानं घट झाली आहे.”