मुंबई प्रतिनिधी :
दि. १२ फेब्रुवारी २०२५
रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यावर अश्लील वक्तव्यांसाठी मोठा संताप व्यक्त केला जात आहे. आता प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यानेही या वक्तव्यांचा तीव्र निषेध केला असून अशा प्रकारच्या सामग्रीवर कठोर सेन्सॉरशिप लागू करण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर त्याने या घटनेची थेट ‘अॅनिमल’ चित्रपटाशी तुलना केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यावर प्रत्येकाकडून राग, रोष व्यक्त केला जात आहे. रणवीरने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये पालकांबाबत केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे तो चांगलाच अडचणीत आला आहे. त्यानं केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर, त्याच्यावर आणि या शोवर प्रचंड टीका केली जात आहे. तसेच हा शो बंद करण्याची मागणीही केली जात आहे. रणवीरने या बद्दल भलेही माफी मागितली असली तरी त्याच्याबद्दल राग व्यक्त केला जात आहे.
रणवीर, समय आणि या शोमधील सदस्यांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच या सर्वांची पोलीस चौकशीही सुरू आहे. मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनीही त्याच्या वक्तव्यावरून टीका केली आहे.आता या प्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी यानेही प्रतिक्रिया दिली आहे.
ध्रुव राठीने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यानं अशा पद्धतीची अश्लील वक्तव्ये करण्यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. “मी नेहमीच शिवीगाळ आणि अश्लील भाषेच्या विरोधात आहे. मी बनवलेल्या 1000 हून अधिक व्हिडीओ, शॉर्ट्स व रील्समध्ये तुम्हाला कोणासाठीही अपशब्द दिसणार नाही. ‘डंक कॉमेडी’च्या नावाखाली आज जे काही चाललं आहे, ते पूर्णत: चुकीचं आहे.” असं म्हणत त्याने संताप व्यक्त केला आहे.
ध्रुवनं पुढे म्हटलं आहे, “प्रेक्षकांना धक्का बसेल किंवा वाईट वाटेल असं काहीतरी करणं, हा अशा व्हिडीओंचा एकमेव उद्देश असतो. त्यामुळे आपल्या तरुणांच्या नैतिक आणि बौद्धिक विकासावर घातक परिणाम होतो.अशा माहितीवर सरकारी बंदीची मागणी करणं हा काही ठोस उपाय नाही. त्याव्यतिरिक्त येथे कठोर सेन्सॉरशिप व्यवस्था लागू केली जाऊ शकते.”
ध्रुवने पुढे बॉलीवूडच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाशी या घटनेची तुलना केली. तो म्हणाला आहे की, “इंडियाज गॉट लेटेंट सारख्या शोमुळे समाजातील व्यक्तींच्या नैतिकतेवर ‘अॅनिमल’ चित्रपटासारखा प्रभाव पडतो, हे त्यांना कठोर शब्दांत सांगण्याची गरज आहे.अशा माहितीवर सरकारी बंदीची मागणी करणं हा काही ठोस उपाय नाही. त्याव्यतिरिक्त येथे कठोर सेन्सॉरशिप व्यवस्था लागू केली जाऊ शकते.तसेच अशी माहिती समोर येऊ नये म्हणून कंटेन्ट क्रिएटर्सवर आणखी चांगला कन्टेन्ट बनवण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे.”
असं म्हणत ध्रुवने अशा कन्टेन्टला आणि अशा शोला ज्यामधे फक्त शिवीगाळ, अश्लील कमेंट्स केल्या जातात असे शो बंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात आता पुढे काय होणार तसेच रणवीर आणि समय , त्याची टीम यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.