पुणे प्रतिनिधी :
दि. १२ फेब्रुवारी २०२५
राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाच्या वृत्तामुळे सोमवारी एकच खळबळ उडाली होती. मात्र, प्रत्यक्षात ऋषिराज सावंत हा मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे तपासात समोर आले होते. ऋषिराज सावंत हा सोमवारी दुपारी पुण्यातील विमानतळावरुन खासगी चार्टर्ड प्लेनने बँकॉकला गेला होता. मात्र त्याच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्याचे विमान माघारी वळवण्यात आले. आता याबद्दल पुणे पोलीस आयुक्त यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाची तक्रार ते बँकॉकसाठी निघालेले विमान परत कसे आणण्यात आले, याबद्दलची माहिती दिली. तसेच त्यांनी आम्ही या सर्व घटनाक्रमाचा अभ्यास करत आहोत, असेही म्हटले आहे.
“देशाच्या बाहेर गेले असते तर ते वळवणं अवघड झालं असतं”
तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली होती. ती अपहरणाची तक्रार अद्यापपर्यंत मागे घेण्यात आलेली नाही. ऋषिराज सावंत यांचे विमान जर देशाच्या बाहेर गेले असते तर ते वळवणं अवघड झाले असते. ऋषिराज सावंत यांच्या अपहरणासंदर्भात तपासात काहीही आढळलेले नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
“ऋषिराज सावंत हे बिझनेस मिटिंगसाठी बँकॉकला गेले होते का, हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. त्यादिवशी तानाजी सावंत आणि त्यांचे कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत होते. काही घटना घडण्याआधी पुणे पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. विमान वाहतूक प्रशासनाला आम्ही मेल केला होता, त्यानंतर विमान परत आणण्यात आम्हाला यश आलं. सध्या आम्ही या सर्व घटनाक्रमाचा तपास करत आहोत”, असे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार नाही
दरम्यान “राहुल सोलापूरकर याच्यावर प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्याचा प्रकार दिसत नाही. मात्र त्यांच्या सर्व जुन्या व्हिडिओचा अभ्यास करून आम्ही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेणार आहोत”, असेही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले.