मुंबई प्रतिनिधी :
दि. १२ फेब्रुवारी २०२५
‘छावा’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटातील कलाकारांना किती मानधन मिळालंय, याबद्दलची माहिती जाणून घेऊयात..
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याला दहा कोटी रुपयांचं मानधन मिळाल्याचं कळतंय. चित्रपटातील इतर कलाकारांच्या तुलनेत ही खूप मोठी रक्कम आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई भोसलेंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रश्मिका आणि विकी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या भूमिकेसाठी तिला चार कोटी रुपये फी मिळाली आहे. अभिनेता अक्षय खन्ना या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या भूमिकेतील त्याचा लूक पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अक्षयला दोन कोटी रुपये मानधन मिळाल्याचं समजतंय. ‘छावा’मध्ये अभिनेते आशुतोष राणा यांनी सरसेनापती हंबीरराव मोहितेंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांना 80 लाख रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय. अभिनेत्री दिव्या दत्तासुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. दिव्याची भूमिका नेमकी कोणती हे अद्याप स्पष्ट झालं नसून ट्रेलरमध्ये मात्र तिची एक झलक पाहायला मिळाली. या भूमिकेसाठी तिला 45 लाख रुपये मानधन मिळालं आहे.