मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ फेब्रुवारी २०२५
सध्या सिनेविश्वात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ या या सिनेमाचीच चर्चा आहे. आज व्हॅलेंटाईन डे ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा ऐतिहासिक चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. या सिनेमाची प्रेक्षकांमधली क्रेझ त्याच्या अॅडव्हान्स बुकिंग मुळे समजून येते. बुकिंग सुरू झाल्यापासून फक्त एका दिवसातच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधी रुपये कमावले आहेत.
९ फेब्रुवारी २०२५ रोजी, निर्मात्यांनी ‘छावा’ चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू केले होते. थिएटरची तिकीट खिडकी उघडताच तिकिटांची विक्री वेगाने सुरू झाली. त्यानंतर एक दिवसात या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सॅक्निल्कच्या मते, छावाची आतापर्यंत एका दिवसात ८१९९१ तिकिटे विकली आहेत. एवढी तिकिटे विकून, छावा सिनेमाने आपल्या खात्यात सुमारे २.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.
छावा सिनेमाला एकूण ५५६५ शो मिळाले आहेत, त्यापैकी हिंदी 2डी ला ५४४४, हिंदी आयमॅक्स 2डी ला ६१, हिंदी 4डीएक्स ला ५१ आणि हिंदी आयसीई ला ९ शो मिळाले आहेत. एकूण मिळून, छावाचे संपूर्ण भारतात ५५६५ शो लागणार आहेत. हा सिनेमा नक्कीच कोट्यवधी रुपये कमावले.
छावाची कथा मराठा साम्राज्याचे धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे, तर रश्मिका मंदान्ना संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबचे पात्र सांकारुन खलभूमिकेत पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे तर निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असलेला हिंदी भाषिक चित्रपट ‘छावा’ आज शुक्रवार, १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात ‘छावा’चे आकर्षण पहायला मिळत असून ‘बॉक्स ऑफीस’वर तो गेल्या काही महिन्यांतील सर्वाधिक आगाऊ तिकीट विक्री होणारा चित्रपट ठरत आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात या चित्रपटाची आगाऊ ३ लाख २५ सहस्र तिकीट विक्री झाली आहे. कोल्हापूर येथे पहिल्यांदाच ‘आयनॉक्स’ या चित्रपटागृहात सकाळी ६.३० पासून खेळ लावले असून उद्या दिवसभरात होणार्या २० खेळांची तिकीटविक्री झालेली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी प्रसंगी मृत्यू पत्करला; मात्र धर्मपरिवर्तन केले नाही. अशा छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र संपूर्ण देशभरात या निमित्ताने पोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
१४ फेब्रुवारी हा कथित ‘व्हॅलेंटाईन’ दिवस नाही’, तर ‘धर्मासाठी प्राणत्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत’, हेच आज तरुणाई ठणकावून सांगेल आणि चित्रपटगृहांमध्ये ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणा घुमतील !