मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ फेब्रुवारी २०२५
बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री जिने सिनेविश्वाला राम राम करुन साध्वी होण्याचा निर्णय घेतला, ती ममता कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. ममता किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावर कायम असल्याचे समोर आले आहे. तिने काहीच दिवसांपूर्वी या पदाचा राजीनामा दिला होता, जो आता तिने मागे घेतला आहे. ममताने म्हटले की, तिच्या गुरू लक्ष्मी त्रिपाठी यांनी तिने दिलेला राजीनामा स्वीकारला नाही.
अलीकडेच १० फेब्रुवारी रोजी ममताचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तिने किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. किन्नर आखाड्यातील अंतर्गत वादाचा तिला सामना करावा लागला, परिणामी ममताने महामंडलेश्वर पद सोडले होते. ती म्हणाली होती की, “काही लोकांना माझ्या महामंडलेश्वर असण्यावर समस्या आहे.” तिने शंकराचार्यांचेही नाव घेतले आणि किन्नर आखाड्यांच्या वादात ती फसल्याचेही ती म्हणाली. आता मीडिया रिपोर्टनुसार ती पुन्हा एकदा महामंडलेश्वर झाली आहे.