रत्नागिरी प्रतिनिधी :
दि. १५ फेब्रुवारी २०२५
कोकणात ऑपरेशन टायगरनं वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. माजी आमदार राजन साळवींनी परवा शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता आणखी एक माजी आमदार शिंदेंच्या गळाला लागला आहे. त्यामुळे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत कोकणात ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. तर कधीकाळी बालेकिल्ला राहिलेल्या कोकणात विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे आता भविष्याचा विचार करता ठाकरेंचे शिलेदार शिंदेसेनेची वाट धरु लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. विधानसभेला शिवसेनेनं रत्नागिरीत दोन जागा लढवत दोन्ही जिंकल्या. एक जागा त्यांनी ठाकरेंच्या पक्षाकडून खेचली. राजापूरात किरण सामंत यांनी ठाकरेंच्या पक्षाचे आमदार राजन साळवींचा पराभव केला. त्यानंतर साळवींनी परवाचा ठाण्यात जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज शिंदेंच्या आभार यात्रेत आणखी एका माजी आमदाराचा पक्षप्रवेश होणार आहे.
माजी आमदार सुभाष बने आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मशाल सोडून ते हाती धनुष्यबाण घेतील. त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा ठाकरेंसाठी मोठा झटका मानला जात आहे. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे ठाकरेंच्या गडाला सुरुंग लागला असून त्यांचे बुरुज एकापाठोपाठ ढासळू लागले आहेत. शिंदेंचे कोकणातील नेते आता शतप्रतिशतची भाषा करु लागले आहेत. त्यामुळे कोकणात शिवसेनेचा होत असलेला विस्तार भाजपची चिंता वाढवणारा आहे.
माजी आमदार सुभाष बने यांचा पक्षप्रवेश आज संपन्न होणार आहे. संगमेश्वर, चिपळूण, लांजा परिसरात त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशानं शिवसेनेला बळ मिळणार आहे. ‘संगमेश्वर तालुक्याला गेली २० वर्षे आमदार नाही. त्यामुळे तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहे. ते सोडवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे,’ असं सुभाष बने यांनी सांगितलं.
“निर्णय घेण्याआधी मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. ८० टक्के कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची भूमिका घेतली. शिवसेनेत प्रवेश करण्यामागे ३ महत्त्वाची कारणं आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका, शब्द पाळण्याची त्यांची क्षमता, कार्यकर्त्यांमधून पुढे आलेले असल्यानं त्यांना कार्यकर्त्यांची असलेली जाण यामुळे त्यांच्या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती बने यांनी दिली.