दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यात सध्या विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यातील एकाही गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू नाहीत. याला अपवाद आहे फक्त एक गाव. ते म्हणजे सासवड. शहरात तीन चार दिवसांनी एखाद्या वेळेस तोही किरकोळ पाणीपुरवठा होत आहे. सासवडकर नागरिक मागील काही महिन्यांपासून त्यामुळे हैराण आहेत. तेंव्हा, या सर्व परिस्थितीला आमदार संजय जगताप कसे सामोरे जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सासवडला नागरिकांमध्ये दहशत इतकी असते की याबाबत आवाजसुद्धा कुणी उठवत नाही. सामान्य माणसाचं सोडा, कुण्या पत्रकाराने यावर चार ओळी लिहिल्याचं आपण नजीकच्या कालावधीत पाहिलं नसेल. युट्यूब चॅनेलवाले तर इतकं लोटांगण घालतात की चार दिवसांनी पाणी मिळूनही सासवडकर कसे कमालीचे खुश आहेत हे सांगायलाही ते कमी करणार नाहीत.
विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे वीर धरणात तुडुंब पाणीसाठा आहे. नीरा डावा आणि नीरा उजवा कालवा दुथडी भरून वाहत आहे. पण सासवड शहरात कधी चार दिवसांनी तर कधी पाच दिवसांनी नळाला पाणी येत आहे. अनेक सोसायट्या, दत्तनगर, इंदिरानगर व इतर वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तोही धड केला जात नाही अशी सामान्य माणसांची ओरड आहे. २४ तास पाण्याची पट्टी नागरिकांकडून वसूल केली जाते आणि पाणी मिळते आठवड्यातून एकदा …
दुथडी भरुन वाहणारे कालवे
आणि ते १२०० कोटी खर्च करणार होते …
पुरंदरचे आमदार संजय जगताप पदरचे १२०० कोटी खर्चून गुंजवणीचे पाणी तालुक्याला आणणार होते. त्याबाबत दीड वर्षात त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. तिकडे पाईपलाईनचं काम शिवतारेंनी सुरु केलं तरी इकडे आमदारांना पत्ता नव्हता. आता तर परिस्थिती इतकी भयाण आहे की आमदारांच्या गावातच प्यायला पाणी नाही. वापरायच्या पाण्याची गोष्ट तर दूरच. लोक स्वतःच्या पैशाने टँकर विकत घेत आहेत. ग्रामीण भागात पाहायला मिळणारी वणवण आता सासवड शहरात पाहायला मिळत आहे.
हा सगळा मामला बघून एक गाणं आठवल्याखेरीज राहत नाही,
‘तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा’