धुळे प्रतिनिधी :
दि. २५ फेब्रुवारी २०२५
गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने धुळ्यात आलेल्या शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील दोघा महाविद्यालयीन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील संतोषी माता चौकात पकडले. त्यांच्याकडून ३५ हजार ८३२ रुपये किमतीची औषधे, मोटारसायकलसह एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या रॅकेटमध्ये शिरपूर शहरातील एका शैक्षणीक संस्थेच्या लिपिकाचाही समावेश असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पथकाने शहरातील संतोषी माता चौकातून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून औषधांच्या साठ्यासह मोबाईल, दुचाकी असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच शिरपूरातील अर्थे गावातील एका माध्यमिक विद्यालयातील फार्मसीचे शिक्षण घेतलेला लिपीक महेश ईशी नामक कर्मचारी हा गेल्या अनेक वर्षापासून गुंगीकारक औषधांचा साठा आणून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन दोघांकडून २० हजार रूपये किंमतीच्या मोबाईलसह २० हजार रूपये किंमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ४५ हजार ८३२ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. अटक करण्यात आलेल्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीस्वार संशयित कल्पेश गोकुळ जगदाळे (वय २०), अजय श्रावण कोळी (वय २०, दोघे रा. खर्दे बुद्रुक ता. शिरपूर) यांना अडवून त्याची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडील बॉक्समध्ये ३५ हजार ८३२ रूपये किंमतीच्या गुंगीकारक औषधांसह गोळ्या आढळून आल्या. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, अमित माळी, औषध निरीक्षक किशोर देशमुख, ASI संजय पाटील, पो. हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार, हेमंत पाटील यांनी केली आहे. सदर प्रकरणाची अधिक चौकशी पोलिस करत आहेत.