मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ फेब्रुवारी २०२५
मालिकाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून टीव्ही मालिका ‘लाखात एक आमचा दादा’, ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम टीव्ही अभिनेता संतोष हणमंत नलावडे यांचं निधन झालं आहे. संतोष यांचा अवघ्या ४९व्या वर्षी नांदेड येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला.
संतोष नलावडे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रेकॉर्ड विभागात कार्यरत होते. नांदेड येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले असताना त्यांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना काल (सोमवारी) दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं. संतोष नलावडे हे मूळचे साताऱ्याचे होते. त्यांच्यावर वाढे (ता. सातारा) या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा मित्र परिवार मोठा होता.
संतोष नलावडे यांनी अभिनयाची आवड असल्याने नोकरी करतानाच त्यांनी अभिनय करण्यासही सुरुवात केली. त्याचबरोबर हौशी नाटकांमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या संतोश यांनी अप्पी आमची कलेक्टर, शेतकरी नवरा हवा, लाखात एक आमचा दादा, मन झालं बाजींद, कॉन्स्टेबल मंजू, लागीर झालं जी यांसारख्या मालिकेतही काम केलं होतं, तसंच त्यांनी विविध मराठी चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व शोक व्यक्त करत आहे.
दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेबद्दल सांगायचं तर ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेत तुळजाची भूमिका साकारणाऱ्या मुख्य अभिनेत्रीने प्रकृतीच्या कारणास्तव या मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता ‘तुळजा’ च्या भूमिकेत अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरने एन्ट्री घेतली आहे. यापूर्वी तिने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत राजमाची भूमिका साकारली होती. अशातच आता नव्या तुळजाला प्रेक्षक किती प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर नव्या तुळजा पाठोपाठ मालिकेत सूर्याची आई म्हणून राजश्री निकम या मराठी अभिनेत्रीची एन्ट्री झालीये. त्यामुळे आता मालिकेत कोणता ट्विस्ट येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.