पुणे प्रतिनिधी :
दि. २७ फेब्रुवारी २०२५
पुण्यात स्वारगेट एसटी आगारात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडलीये. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून पुण्यातील इतक्या गजबजलेल्या आगारात मुलीवर अत्याचार झाल्याने सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले जात आहेत. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. मुलगी ही पुण्यात नोकरीला होती आणि आपल्या गावी फलटणला निघाली होती. ती स्वारगेट आगारात एसटीची वाट पाहात बसली असताना नराधमाने तिला जाळ्यात ओढले आणि शिवशाही बसमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला.
आता या प्रकरणात अनेक गंभीर खुलासे होताना दिसत आहेत. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर काही गुन्हांची नोंद आहे. आता आरोपीबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आलीये. आरोपी दत्तात्रय गाडे हा रात्री दीड ते दोन वाजल्यापासून स्वारगेट आगारात फिरत होता. सीसीटीव्हीमधून हे स्पष्ट होत आहे की, गाडे हा स्वारगेट आगारात रात्रीच दाखल झाला होता आणि तो फिरताना स्पष्ट दिसत आहे. रात्रीच्या वेळी सराईत गुन्हेगार इतका वेळ स्वारगेट आगारात फिरत होता.
तरुणी त्याला एकटी बसल्याचे दिसले आणि त्याने याचाच फायदा घेतला. गोड बोलून त्याने तिला अगोदर विश्वासात घेतले. त्याने ताई म्हटल्याने या तरुणीने त्यावर विश्वास ठेवला. आरोपीने आपल्या चेहऱ्यावर मास्क देखील लावले होते. मात्र, असे असताना देखील त्याची ओळख ही पटली आहे. पोलिस त्याच्या शोधात असून पोलिसांनी आठ पथके आरोपीच्या शोधात तयार करून त्याचा शोध घेतला जात आहे. यासोबतच पोलिसांनी अनेकांची चौकशी केलीये.
आरोपीच्या भावाची काही तास चौकशी ही पोलिसांकडून करण्यात आलीये. नराधमाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जाते आहे. या घटनेनंतर मोठा संताप व्यक्त केला जात आहे. स्वारगेट आगार महिला आणि मुलींसाठी सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून दिसत आहे. नेमके काय घडले होते, याची माहिती मुलीने पोलिसांना दिलीये. ससूनमध्ये मुलीची तपासणी केली असता तिचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून तिच्यावर दोनदा अत्याचार करण्यात आल्याचेही स्पष्ट झालंय.