पुणे प्रतिनिधी :
दि. २७ फेब्रुवारी २०२५
पुणे देशातील शिक्षणाचे माहेरघर. राज्याची सांस्कृतिक राजधानी. परंतु पुन्हा एका अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील स्वारगटेसारख्या गजबजलेल्या बस स्थानकावर पहाटे शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. स्वारगेट बस स्थानकावर सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा असतो. या बसस्थानकावर २४ तास नेहमी वर्दळ असते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर या ठिकाणी असते. त्यानंतरही पहाटे ५.३० वाजता अत्याचार प्रकरण घडले. यामुळे सांस्कृतिक पुणे हादरले आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. गाडे हा शिरुर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होत आहे. त्यावर आमदार माऊल कटके यांनी प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी यासंदर्भातील सर्व आरोप आणि चर्चा फेटाळल्या आहेत.
“माझा मतदारसंघ हा अतिशय मोठा आणि विस्तृत आहे. मतदार संघातील कामानिमित्त अनेक लोक मला भेटत असतात. त्या आरोपीशी माझा कुठलाही संबंध नाही. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा, अशी माझी मागणी आहे” असे ते म्हणाले.