डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २७ फेब्रुवारी २०२५
न्यूझीलंडनं बांगलादेशचा पराभव करून सेमिफायनल राऊंडमध्ये आपली जागा पक्की केली आहे. न्यूझीलंडच्या या विजयासोबतच पाकिस्तानच्या चॅम्पियन ट्रॉफीमधील शेवटच्या आशा सुद्धा संपल्या. आता पाकिस्तानी टीम अधिकृतरित्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे अर्थातच भारताविरोधात पराभूत झालेल्या पाकिस्तानी खेळाडूंवर प्रचंड टीका केली जात आहे. फॅन्स मंडळी तर हे खेळाडू दिसतील तिथे त्यांची इभ्रत काढत आहेत.
याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नसिम शाह याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये चक्क एक सिक्युरिटी गार्डनं त्याला सुनावलं. तुझ्यानं धड १ मजला सुद्धा चढला जात नाहीये असा खरमरीत टोला त्याला लगावला. त्यानंतर नसिमनं काय केलं हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून पाकिस्तानी खेळाडूंची आणखी फिरकी घेतली जात आहे.
हा व्हिडीओ दुबईमधील आहे. सराव संपल्यानंतर नसिम शाह हॉटेलमधील आपल्या खोलीत जात होता. त्याची खोली पहिल्या मजल्यावर होती. त्यामुळे तळमजल्यावर तो लिफ्टची वाट पाहात होता. पण बराच वेळ लिफ्ट काही येईना. त्यामुळे तो जाम वैतागला होता. तेवढ्यात एक सिक्युरिटी गार्ड आला आणि त्यानं नसिम शाहची पूर्ण हेकडीच बाहेर काढली. अरे तुझी खोली पहिल्या मजल्यावर आहे. तुला एक मजला सुद्दा धड चढून जाता येत नाही का? असा खरमरीत सवाल त्याला केला. अर्थात सिक्युरिटी गार्डनं सुनावताच नसिम भडकला आणि रागाच्या भरात जिन्यांनी वरच्या मजल्यावर गेला. ही संपूर्ण घटना तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. अन् आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ saimaharoon1 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ गेल्या काही तासांत ५४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय नेटकरी हा व्हिडीओ पाहून नसिम शाहची फिरकी घेत आहेत. कारण त्याची फिटनेस किती खराब आहे हे आपण मॅचमध्ये पाहिलंच आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी फॅन्स सिक्युरिटी गार्डवर टीका करत त्याला नोकरीवरून काढून टाकाण्याचा सल्ला देत आहेत.