पुणे प्रतिनिधी :
दि. २८ फेब्रुवारी २०२५
स्वारगेट एसटी आगारात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना २५ फेब्रुवारीला घडली. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अखेर ६८ तासांनी पोलिसांच्या हाती लागला. गाडेला शिरुरमधील त्याच्या गुणाट गावातून अटक करण्यात आली. पोलिसांची १३ पथकं त्याचा शोध घेत होती. ड्रोन स्क्वॉड, डॉग स्क्वॉडच्या मदतीनं पोलिसांनी गाडेच्या मुसक्या आवळल्या. गाडेच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण आढळून आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीदेखील या माहितीला दुजोरा दिला आहे. आरोपी दत्तात्रय गाडेनं तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गाडेच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत. गाडेनं आत्महत्या केल्याचं या व्रणांमधून दिसून आलं आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास गाडेनं एसटी आगारातील एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तो सकाळी ११ वाजता शिरुरमधील त्याच्या गुणाट गावात आला. संध्याकाळी ५ नंतर तो गायब झाला. दुपारी दोनच्या सुमारास त्यानं मोबाईल बंद केला. त्यामुळे त्याचं अखेरचं लोकेशन त्याचंच घर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस आपल्या मागावर असल्याचं समजताच गाडे फरार झाला. तो शेतात जाऊन लपला. तिथे त्यानं एका झाडाला दोरी बांधली आणि गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण दोरीच तुटल्यानं गाडे वाचला. त्यानंतर पळून जात असताना विष किंवा कीटकनाशक मिळवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून सुरु होता. पण त्याला तेही मिळालं नाही. त्यामुळे त्यानं पुन्हा एकदा गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पण यावेळीही त्याला अपयश आलं.
दत्तात्रय गाडेच्या अटकेचा थरार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितला. आरोपीच्या गळ्यावर दोरीचे व्रण आहेत. त्यामुळे त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, हे स्पष्ट होतं. खुद्द आरोपीनंही त्याबद्दल कबुली दिली आहे. आत्महत्येचे प्रयत्न केले. पण दोरी तुटल्यामुळे आणि इतर लोक वेळीच धावून आल्यानं जीव वाचला, अशी माहिती गाडेनं दिल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.