मुंबई प्रतिनिधी :
दि. २८ फेब्रुवारी २०२५
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. बस स्थानकामध्ये पहाटेला दत्ता गाडे या नराधमाने शिवशाही गाडीमध्ये नेत तिच्यावर अतिप्रसंग केला होता. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना तीन दिवस लागले. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दत्ताला तीन दिवसांनी अटक करण्यात आलीय. शिरूर येथील गुनाट गावच्या शिवारात त्याला अटक झाली. या अटकेनंतर त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. अशातच यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं आहे. लवकरच ही जी घटना आहे तिचा पर्दाफाश होईल. त्यासंदर्भात काही माहिती पोलीय आयुत्तांनी दिली आहे. काही माहिती या स्टेजला देणं योग्य नाही. ज्यामध्ये नेमका घटनाक्रम काय हे योग्य वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचेल. यावेळी पत्रकाराने दत्ता गाडेचा अक्षय शिंदे होणार का? असा प्रश्न विचारला, यावर बोलताना आता यावर बोलणं खूप लवकर बोलल्याप्रमाणे होईल. आता पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. आज कस्टडी मिळेल त्यानंतर चौकशी होईल. काही तांत्रिक आणि फॉरेन्सिक माहिती समोर आल्यानंतर त्या एकत्रित करून यावर बोलणं योग्य राहिलं, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. म्हणजे माझा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की, हा लोकं असलेला परिसर असून बस काही आतमध्ये नव्हती, बाहेरच होती. लोकांना प्रतिकार होताना लक्षात आलं नाही. तथापि ते नवीन आहेत. ते युवा मंत्री असून, काहीतरी करण्याचा प्रयत्न करताहेत, पण मी सल्ला देईन की बोलताना संवेदनशीलपणे बोललं पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली तर समाज मनावर वेगळा परिणाम होतो. निश्चितपणे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी अशा घटनांवर बोलताना संवेदनशीलपणे बोलावं असा माझा सल्ला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.