मुंबई प्रतिनिधी :
दि. ०५ मार्च २०२५
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्हा प्रकाशझोतात आल्यानंतर मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्ताने खळबळजनक माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यात पाच वर्षांत २७६ हत्या, ७६६ हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत हत्येच्या ३६ घटनांची नोंद करण्यात आल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
बीड जिल्ह्यातील हत्येच्या घटना आणि त्यासंदर्भात झालेल्या कारवाईबाबत विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. या उत्तरानुसार बीडमध्ये निकष डावलून गुन्ह्यांची नोंद असणार्या २६० जणांना शस्त्र परवाने देण्यात आल्याच्या प्रश्नालाही उत्तर दिले. बीड जिल्ह्यात गुन्हे नोंद असलेल्या २६० जणांना शस्त्र परवाने देण्यात आले होते. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊन गुन्हे नोंद असलेल्या परवानाधारक तसेच मयत परवानाधारक अशा एकूण १९९ परवानाधारकांची शस्त्रे आणि परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्येप्रकरणी ८ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू असून एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणी केज येथील पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आल्याचेही स्पष्ट केले. तर, रामपुरी येथील बालाजी घरबुडे आणि परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू असल्याचेही सांगितले.