यवतमाळ प्रतिनिधी :
दि. ०६ मार्च २०२५
घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षांच्या बालिकेवर शेजारच्या १५ वर्षांच्या मुलाने अत्याचार केला. मारेगाव तालुक्यातील एका गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. आईवडील शेतात मजुरीवर गेल्याने पीडिता आजीबरोबर घरीच होती. सायंकाळी मुलगी घरासमोर खेळत असताना त्याने गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी पीडितेचे आईवडील घरी असता त्यांना मुलगी दिसली नाही. शोध घेतला असता मुलगा घाईघाईने गोठ्यातून निघून जाताना दिसला. मुलीच्या पालकांना संशय आला असता त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले. मुलगी रडत होते. विश्वासात घेऊन आईने विचारपूस केली असता तिने अत्याचाराची माहिती दिली. पालकांनी मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या आधारावर पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून मुलास ताब्यात घेतले.
दुसरीकडे, ऑटोचालकाने मित्राच्या सहाय्याने दोन बहिणींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत त्यांनी ऑटोचालकाचा डाव उधळून लावला. ही खळबळजनक घटना सोमवारी कारंजा तालुक्यातील रामनगर येथे उघडकीस आली. वाशीम जिल्ह्यातील या वाढत्या घटनांवरून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेली वीस वर्षीय युवती १ मार्चला लहान बहिणीचा दहावीचा पेपर असल्याने कारंजा तालुक्यातील रामनगरला आली. दुपारच्या सुमारास परीक्षा केंद्राबाहेर उभ्या ऑटोचालकाला रामनगर फाटा येथे जायचे असल्याचे सांगितले.
त्याने होकार देताच दोघीही ऑटोमध्ये बसल्या. यापूर्वीच ऑटोमध्ये एक व्यक्ती बसलेला होता. ऑटो रामनगर फाट्याच्या दिशेने निघाला पण, वाटेतच थांबला. याला दोघी बहिणींनी विरोध केला असता चालकाने ऑटो वेगाने पळविला. त्यामुळे घाबरलेल्या दोघींनीही ऑटोमधून उड्या मारल्या आणि त्या मुख्य रस्त्यावर आल्या. यानंतर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर ऑटोचालक व त्याच्या साथीदारावर कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाशीम शहरात आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेलेल्या सात वर्षीय बालिकेवर १९ वर्षीय युवकाने अत्याचार केला होता. या घटनेनंतर दोनच दिवसांत रिसोड शहरात अल्पवयीन मुलीला ऑटोतून नेऊन अतिप्रसंग केला होता. या दोन घटनांनंतर आता कारंजा तालुक्यातही अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आल्याने अत्याचाऱ्यांवर कडक वचक निर्माण करण्याची मागणी जोर धरत आहे. तीन दिवसांत तीन घटनांमुळे संताप वाढू लागला आहे.