डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०६ मार्च २०२५
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अबू आझमींच्या या विधानानंतर राज्यभरात पडसाद उमटले होते. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीउत्तर प्रदेश विधानसभेतून अबू आझमी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
अबू आझमींना पक्षातून हकलून द्या…तसेच कमबख्त अबू आझमींना एकदा उत्तर प्रदेशला पाठवा, आम्ही उपचार करु…असा हल्लाबोल योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमींवर केला आहे. तसेच अबू आझमींना भारतात राहण्याचा अधिकार आहे का?, याचं उत्तर समाजवादी पार्टीने द्यावे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. समाजवादी पक्षाला भारताच्या वारशाचा अभिमान नाही, किमान ज्यांच्या नावाने ते राजकारण करतात त्यांचे तरी ऐकले पाहिजे. डॉ. लोहिया म्हणाले होते की भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे भारतीय संस्कृतीचा आधार आहेत. आज समाजवादी पक्ष डॉ. लोहिया यांच्या तत्वांपासून दूर गेला आहे. आज त्यांनी औरंगजेबाला आपला आदर्श म्हणून स्वीकारले आहे. औरंगजेबाचे वडील शाहजहान यांनी लिहिले होते की, देवाने अशी मुले कोणालाही देऊ नयेत, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
अबू आझमी यांना औरंगजेबाच उदात्तीकरण करणं भोवलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच सदस्यत्व रद्द करा अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. औरंगजेबाबद्दल अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटलं होतं. त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत आझमी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.
अबू आझमी यांनी म्हटलं होतं की, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती. एवढंच नाही तर त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के होता त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हणायचे.संभाजी महाराज आणि औरंगजेबमधील लढाई सत्ता मिळवण्यासाठीची होती. त्यांच्यात धर्माची नाही तर, सत्तेसाठी लढाई झाली, असे त्यांनी म्हटले होते.