मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि.२९ मे २०२१
संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकारला लागलेली घरघर काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. कारण, त्यानंतर मंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलिस अधिकारी वझे व परमवीर सिंह यांनी राजीनामे दिले आहेत. तेंव्हा, आता पुढचा नंबर शिवसेनेचे मंत्री अनिल परब व राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
ते आज सोलापुर दौ-यावर होते, त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील खळबळजनक दावा केला आहे. पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकावं अशी आमची इच्छा आहे. मात्र, कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने केलेला भ्रष्टाचार व या सरकारमधील जवळपास अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेते यांच्या भ्रष्ट्राचाराची प्रकरणे बाहेर काढू. त्यावेळेस या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येईल.
महाविकास आघाडी सरकारने जास्त अहंकाराने वागू नये. भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याच्या जालन्यातील कार्यकर्त्यास अमानवी पद्धतीने पोलीसांनी मारहाण केली आहे. त्यामध्ये ४ पोलिसांना निलंबित केले आहे. मात्र, आमची मागणी वरिष्ठ दोन अधिका-यांची तात्काळ हाकलपट्टी करावी अशी आहे असे ही ते बोलताना म्हणाले.
संजय राऊत यांना तोडीचे ५५ लाख पुन्हा द्यावे लागले आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फरार आहेत. मुंबई नगरीच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेतून गाळे घेतल्याचे सिद्ध झाले आहे. अनिल देशमुख यांना जेल मध्ये जायची वेळ आली आहे. तेंव्हा, आता पुढचा नंबर कॅबिनेट मंत्री अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचा खळबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.