पुणे प्रतिनिधी :
दि. ०७ मार्च २०२५
गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस त्यांच्याच एका माणसामुळे अडचणीत सापडले आहेत. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले याचे नवनवीन कारनामे समोर येताना दिसताहेत. हाच खोक्या क्रूरप्रकारे मारहाण करत असल्याचे धक्कादायक व्हिडीओ समोर आलेत. त्यासोबतच वन्य प्राण्यांची शिकार करत असल्याचा आरोप शिरूर परिसरातील वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाटांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय.
“बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसत आहे. सुरेश धस आता आकाच निघाले आहेत. त्यांचेही कार्यकर्ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण सुरेश धस नेमके आवाज का उठवत होते. संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं त्यांचं ध्येय नव्हतं. तर धनंजय मुंडे यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती. बीड जिल्ह्यातील जे काही सगळे नेते असतील आणि त्यांचे असे कार्यकर्ते असतील तर त्यांच्यावर कारावाई करणं गरजेचं आहे,” असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
खोक्या उर्फ सतीश भोसले आणि सुरेश धस यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये सुरेश धस हे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छ देत असून १०० टक्के आपला आशिर्वाद तुझ्या पाठिमागे असल्याचं म्हणत आहेत. सुरेश धस यांनीही तो कार्यकर्ता आपलाच असल्याचं मान्य केलं आहे. मात्र आता खोक्याचे अनेक व्हिडीओ समोर येऊ लागलेत ज्यामध्ये त्याचा उन्माद दिसत आहे.
दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो वन्य जीवांची, म्हणजेच हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याने जवळपास 200 हून अधिक हरीण आणि काळवीट मारले आहेत. तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच ते हरणांचे अवशेष असल्याचा दावा वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाट यांनी केला आहे.