मुंबई प्रतिनिधी :
दि. ०७ मार्च २०२५
अनिल परब यांनी केलेल्या विधानावरून विधान परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळतंय. सत्ताधारी मोठा गोंधळ घालताना दिसले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच माझाही छळ झाला असे थेट विधान अनिल परब यांनी केले होते. त्यांनी स्वत:ची तुलना संभाजी महाराजांसोबत केल्याने सत्ताधारी आक्रमक झाले. परबांविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले. राज्यपांलाच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान अनिल परब बोलत होते.
अनिल परबांच्या या विधानानंतर नितेश राणे सभागृहात आक्रमक झाले आणि त्यांनी परबांवर कारवाई करण्याची थेट मागणी केली. “छत्रपती संभाजी महाराजांसोबत यांनी स्वत:ची तुलना करावी का? अनिल परबांनी शिवभक्तांची माफी मागावी” असे नीतेश राणे म्हणाले. अनिल परबांच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला. यानंतर कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचेही बघायला मिळाले.
यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा देखील सभागृहात गाजला. विरोधीपक्षाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला की नाही? असा प्रश्न उपस्थित केला गेला. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात द्यायला हवी होती, असे विरोधकांनी यावेळी म्हटले आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठी खडाजंगी देखील बघायला मिळाली. अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमाणे माझाही पक्ष बदलावा यासाठी छळ झाल्याचे म्हटले होते.
त्यावरूनच हा मोठा गदारोळ बघायला मिळतोय. परब यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. अनिल परब यांनी अगोदरच स्पष्ट केले की, मी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत बरोबर केली नाहीये. मात्र, यावरून सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे भैय्याजी जोशी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानावरून संजय राऊत यांनी भाजपावर काही गंभीर आरोप केले. यासोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काही सवालही केले.