मुंबई प्रतिनिधी :
दि. 08 मार्च 2025
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच विधानसभेत बोलताना दिसले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील जनतेने महायुतीमधील पक्षांवर खूप मोठा विश्वास दाखवला. आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील ते आपल्या सर्वांचेच दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आदर असलेले हे सरकार आहे. आम्ही कधीही छत्रपतींच्या कुटुंबाला दाखले मागितले नाहीत. आमचा विश्वास आहे की, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सर्व आहोत.
पुढे फडणवीस म्हणाले की, स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाहीये. यापूर्वी देखील मी स्पष्ट केले की, जे जे राज्याच्या हिताचे आहे, ते ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरूवातीला मी होतो नंतर दादाही होते. त्यामुळे घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी एकट्या शिंदेंची नाही तर तिघांची आहे. ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या. त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलीये. सरकार आपणही चालवलंय बऱ्याचदा खालच्या स्तरावर गडबडी होतात.
विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरीही देवेंद्र फडणवीसांचा दणका, खात्याच्या मंत्र्याने जरी स्थगिती दिली तरीही फडणवीसांचा शिंदेंना दणका, असं बोललं जातं. “एक गोष्ट सांगतो की, दादांचे काय आहे ते थेट अटॅक करतात ना…त्याच्यामुळे फार कोणी त्यांच्या वाटं जात नाही. एक गोष्ट सांगतो की, हे समन्वयाने चालणारे सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही जेही निर्णय घेत आहोत, ते तिघे मिळून घेतो. काही बैठकांना दादा असतात काही बैठकांना शिंदे साहेब असतात”.
कधी दोघेही असतात. मात्र, जो आला नाही तो नाराज असल्याचे सांगितले जाते. पुढे फडणवीस म्हणाले की, १ लाख ३० हजार ग्राहकांनी रूफटॉप सोलर लावली. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वीज खरेदीचा दर आपण कमी केला. ९५ टक्के ग्राहकांना वीज दरात दिलासा मिळाला. स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना दिवसाच्या वीजेत १० टक्के सूट देण्याचा प्लॅन असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.