सोलापूर प्रतिनिधी :
दि. ०८ मार्च २०२५
सोलापूरचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापुरात विरोध सुरू झाला आहे.काल (७ फेब्रुवारी) सकाळी सोलापूरमधील महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने जयकुमार गोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “नाव गोरे,कारनामे मात्र काळे” अशा तिखट शब्दांत जयकुमार गोरेंवर सडकून टीका करण्यात आली. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने जयकुमार गोरेंच्या प्रतिकात्मक व्यक्तिला साडीचोळीचा आहेर देण्यात आला. महायुती सरकारमधील मंत्री असे वागत आहेत,ज्यामुळे महिला असुरक्षित आहेत, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. अशी मागणी काँग्रेस महिला आघाडीकडून करण्यात आली.
सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात सोलापूरात आज सकाळपासूनच महिला काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. जयकुमार गोरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला महिला काँग्रेसकडून साडीचोळीचा आहेर देण्यात आला. यावेळी, ‘कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणाऱ्या महायुती सरकारचा निषेध असो” अशा घोषणाही महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आल्या.
“एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवता म्हणून काँग्रेसकडून साडीचोळीचा आहेर गोरेंना देण्यात येतोय” असेही महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणाल्या. पालकमंत्र्याना सोलापुरात फिरू देणार नाही अशा घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा बॉम्ब टाकला. भाजप आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे राऊत यांनी म्हटले होते. पीडिता न्यायासाठी विधानसभेबाहेर धरणे धरणार आहे असेही राऊत म्हणाले होते. राऊत यांनी अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी देखील केली होती. राऊत यांच्या या आरोपांवरून राजकारण चांगलेच तापले. राऊत यांच्या आरोपांवर जयकुमार गोरे प्रतिक्रिया देत म्हणाले की, “या प्रकरणातील निर्णय २०१९ मध्ये देण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने मला निर्दोष सोडले आहे.” जप्त केलेले साहित्य आणि मोबाईल फोन नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. असेही गोरे म्हणाले होते.