मुंबई प्रतिनिधी :
दि. १० मार्च २०२५
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाची सर्वत्र चर्चा असून कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण भारतीय संघाचं कौतुक केलं जात आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहातून भारतीय संघाचं अभिनंदन केलं. विधीमंडळामध्ये अभिनंदनाचा ठराव मांडला. हा ठराव पास करून प्रत्येक खेळाडूला हा अभिनंदनाचा ठराव प्रशस्तीपत्रकासह पाठवण्यात यावा असं सभागृहात सांगितलं.
कालचा दिवसा ऐतिहासिक ठरला, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा भारताने वर्चस्व सिद्ध करत ट्रॉफी जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीरचं अभिनंदन. रोहितच्या नेतृत्त्वात टीमने प्रचंड मेहनत केली. फायनलमध्ये रोहितने आपल्या नेहमीच्या शैलीत बदल करून संथ आणि वेगाने खेळत पिचवर टिकून ७६ धावा काढल्या. याच निर्णायक होत्या. हा विजय म्हणजे असंख्य भारतीय क्रिकेटप्रेमींना अविस्मरणीय भेट संघाने दिली आहे. संपूर्ण स्पर्धेत एक सांघिक भावना पाहायला मिळाली हे वाखणण्याजोगं होतं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला हुलकावणी देत होती आणि मागच्या वेळेचं शल्यही आपल्या मनात होतं. ते शल्य आता काढून टाकू शकल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरूवातीच्या काळामध्ये कोहली आणि रोहित फॉर्ममध्ये नसल्याची टीका होता होती. पण फॉर्म हा तात्पुरता असतो आणि क्लास हा पर्मनंट असल्याचं दोघांनी दाखवून दिल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचे मनापासून कौतुक केले.
१९८३ साली आपण पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलो. त्यानंतर भारतीय क्रिकेटने माघारी वळून पाहिलं नाही. ज्यावेळी ८३ ची टीम इंग्लंडला गेली होती तेव्हा ते पर्यटनाला गेले असल्याचं बोललं जात होतं. पण त्या टीमने विजय मिळवला होता. त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेसोबत संयुक्तपणे विजय मिळवला. त्यानंतर टी-२० वर्ल्ड कप २००७, वन डे वर्ल्ड कप २०११, चॅम्पियन ट्रॉफी २०१३, टी-२० वर्ल्ड कप २०२४ आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकलो आहोत. चॅम्पियन्स ट्रॉफीवर तीनवेळा नाव कोरणारा भारत हा एकमेव देश असल्याचं फडणवीस म्हणाले.