पुणे प्रतिनिधी :
दि. १० मार्च २०२५
गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेवर काँग्रेसचे माजी आमदार आणि नेते रवींद्र धंगेकर यांनी आज शिक्कामोर्तब केलंच. ना ना म्हणता-म्हणता रवींद्र धंगेकरांचं सूत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर अखेर जुळलंच. रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं घोषित केलं, तर संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून अपेक्षित निर्णय घेऊ, असं जाहीर केलं. त्यामुळे रवींद्र धंगेकर हे आता शिंदे सेनेत प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे.
ही घोषणा करण्याच्या दोनच दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी आपण काँग्रेस बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं होतं. शुक्रवारी महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनशी बोलताना धंगेकर म्हणाले होते, माझं काँग्रेसमध्ये काही बिनसलं नाही, मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसमधील बैठकीला मला आमंत्रण असतं, काही बैठकांना कामानिमित्त जाता येत नाही, पण बहुतांश बैठकांना मी हजर असतो. काँग्रेस कशी बळकट होईल यासाठी मी काम करत आहे.
काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवावी. नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत पक्ष वाढीसंदर्भात चर्चा झाली आहे, त्यांनी वेळ दिला की त्यांना भेटणार आहे. या निवडणुकीत मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पुढे घेऊन जाईन. असं ठामपणे रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं होतं.
शुक्रवारपर्यंत आपण काँग्रेस वाढीसाठी काम करणार असं ठामपणे सांगणाऱ्या धंगेकरांचं दोन दिवसात असं काय बिनसलं, की त्यांनी थेट पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला यावरून आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर यांचं काँग्रेसमध्ये बिनसल्याच्या चर्चा वारंवार होत होत्या. धंगेकर ना कोणत्या काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावत होते ना कुठल्या आंदोलनात ते दिसत होते. दुसरीकडे शिंदेंच्या नेत्यांसोबत मात्र त्यांच्या वारंवार बैठका सुरु होत्या. उदय सामंत तर रवींद्र धंगेकर यांच्या मुलाच्या वाढदिवसाला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील उपस्थित होते.
या बैठका सुरू असताना रवींद्र धंगेकर यांनी मात्र आपण काँग्रेसमध्येच आहोत आणि काँग्रेस बळकटीसाठी यापुढे काम करणार, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर पूर्णविराम लावला होता. आज अखेर लोकांची कामं करण्यासाठी सत्तेची गरज असल्याचा साक्षात्कार रवींद्र धंगेकर यांना झाला आणि त्यांनी शुक्रवारी जो पक्ष आपण बळकट करणार असं ठासून सांगितलं होतं, त्यालाच दोन दिवसात रामराम ठोकला आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या पक्ष बदलण्याच्या पॅटर्नमध्ये आणखी एका पक्षाची वाढ झाली आहे.
वास्तविक पाहता रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उदय सामंत यांच्यामार्फत चर्चा सुरू होत्या. यामध्ये रवींद्र धंगेकर यांना पक्षाकडून काय दिले जाणार याच्या वाटाघाटीच्या काही बैठका देखील झाल्याची माहिती आहे. रवींद्र धंगेकर यांनी आज या संदर्भात बोलताना या चर्चा फेटाळल्या असल्या तरी शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार रवींद्र धंगेकर यांनी म्हाडाचे अध्यक्षपद किंवा विधानपरिषद द्यावी अशी मागणी केली होती. त्यासोबतच महापालिका निवडणुकीमध्ये 15 ते 20 जागा आपल्याला मिळाव्यात. अशी देखील मागणी केली होती.
या चर्चेवर धंगेकरांच्या प्रवेशाचं घोडं अडलं होतं. यावर काहीतरी सुवर्णमध्य काढून लवकरच प्रवेश दिला जाईल अशा चर्चा सेनेच्या गोटात सुरू असताना शुक्रवारी रवींद्र धंगेकर यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचं जाहीर केल्यानंतर वेगाने सूत्र फिरली आणि रवींद्र धंगेकर यांचा प्रवेश सेनेत निश्चित झाला. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांना एकनाथ शिंदे यांनी काय कमिटमेंट दिली, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. तूर्तास रवींद्र धंगेकर यांच्या पक्ष बदलाचं शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि आता शिंदे सेना असं वर्तुळ पूर्ण झालं असंच म्हणावं लागेल.