पुणे प्रतिनिधी :
दि. १२ मार्च २०२५
स्वारगेट बस आगारात एका २६ वर्षीय मुलीवर बंद शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना आता अजून एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याने फलटणला जाणारी बस दुसरीकडे लागत असल्याची बतावणी करून मुलीवर अत्याचार केला. हेच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यानंतर आरोपी गाडेला ऊसातून ताब्यात घेतले. तो काही तास ऊसात जाऊन लपला होता. यादरम्यान त्याने तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
२६ वर्षीय मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच स्वारगेट बस आगारात मध्यरात्री वीज नाहीये. स्वारगेट डेपो प्रशासनाचा भोंगळ कारभार या माध्यमातून पुढे आल्याचे बघायला मिळतंय. स्वारगेट बस स्थानकातील वीज मध्यरात्री गायब झाली. पूर्ण आगारात अंधार बघायला मिळाला. मात्र, स्वारगेट डेपो प्रशासन इतकी मोठी अत्याचाराची घटना घडून सुद्धा झोपलेलेच दिसत आहे, त्यांना अजूनही जाग आली नाहीये.
काल मध्यरात्रीचा स्वारगेट आगारातील व्हिडीओ हा सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. स्वारगेट आगार प्रशासन आणखी काही अनुचित घटना होण्याची वाट पाहत आहे का?, हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्यावेळी आगारात लाईट नसल्याने पूर्ण काळोखा झाला, त्यावेळी काही महिला प्रवासी देखील अंधारातच बसची वाट पाहत बसल्याचे चित्र बघायला मिळाले. यासर्व प्रकारानंतर आगार प्रशासनावर टीका केली जात आहे.
अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच अजूनही प्रशासनाला जाग आली नसल्याचे म्हणताना लोक दिसत आहेत. आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिस कोठडीत असून त्याची चाैकशी सुरू आहे. गुन्हे शाखेने त्याची चौकशी तीन तास केली. मात्र, या चौकशीत तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे सांगितले जाते. मुलीवर अत्याचार केल्यानंतर गाडे सात लोकांना भेटला होता. त्यांची देखील पोलिसांनी चौकशी केली. पोलिस सध्या गाडेच्या मोबाईल फोनचा शोध घेत आहेत. मात्र, त्याने पोलिसांना फोन हरवल्याचे सांगितले आहे.