बीड प्रतिनिधी :
दि. १२ मार्च २०२५
बीडच्या शिरूरकासार येथील गुंड सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्यावर सातत्याने गंभीर आरोप होताना दिसत आहेत. खोक्याने आतापर्यंत तब्बल २०० हरण्यांची शिकार केल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर त्याचे बेदम मारहाणीचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत, ज्यानंतर मोठी खळबळ माजली. सतीश भोसले बॅटने एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसला. आता सतीश भोसले याचे नवनवीन कारनामे उघड होताना दिसत आहेत. सतीश भोसले याच्यामुळे आमदार सुरेश धस यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत.
सतीश भोसलेची दहशत इतकी जास्त की, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास गेलेल्या ढाकणे कुटुंबियांची साधी तक्रार देखील पोलिसांनी घेतली नाही. सोशल मीडियावर क्रूर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. गेल्या काही दिवसांपासून खोक्याच्या शोधात पोलिस आहेत. मात्र, तो अजूनही फरार आहे. फरार असतानाच त्याने एका चॅनेलला मुलाखत दिली. लोक पोलिसांवर आरोप करताना देखील दिसत आहेत.
सतीश भोसले याची संपत्ती करोडोंच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. आता सतीश भोसले याची संपत्ती जप्त करण्याची थेट मागणीच केली जातेय. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्र पाठवून ही मागणी केलीये. सतीश भोसले उर्फ खोक्या याची प्रॉपर्टी जप्त करण्याचे पत्र पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे देण्यात आले आहे. आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी या पत्रातून मागणी केली आहे.