मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि.३० मे २०२१
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तेंव्हा, महाराष्ट्रात 1 जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिले आहेत.
राज्यातील 21 जिल्ह्यांत कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अजून ही वाढ होत आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीत कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. राज्यात 1 जूननंतरही निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत झालं असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यामध्ये काही शिथिलता देण्याचा सरकार निश्चितपणे विचार करीत आहे. तेंव्हा, महाराष्ट्रातील सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विशेष करुन ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता आता असलेले सर्व निर्बंध तसेच ठेवावेत असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंधांमध्ये शिथिलता करावी अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे. परिणामी, आता राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. तसेच, 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
इतर राज्यांतील लॅाकडाऊन विषयी धोरण.
महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांतील कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन किंवा इतर निर्बंध पुढील पंधरा दिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्ली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.