नागपूर प्रतिनिधी :
दि. १७ मार्च २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू असलेले नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर जोशी समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे. आमदार प्रवीण दटके विधानसभेवर निवडून गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे ही जागा कुणाची, याबाबत उत्सुकता होती. जोशी यांच्यासह शहरातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत होती. अखेर पक्षाने जोशी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना संधी दिली. हे त्यांच्या संयमाचे फळ असल्याचे बोलले जात आहे.
विधान परिषदेतील पाच रिक्त जागांसाठी २७ तारखेला निवडणूक होणार आहे. यापैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. त्याची यादी भाजपने रविवारी सकाळी जाहीर केली. त्यात संदीप जोशी यांच्यासह आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे तसेच संजय केणेकर यांचा समावेश आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर असा राजकीय प्रवास असलेले जोशी हे विविध सामाजिक व क्रीडाविषयक उपक्रमांच्या आयोजनामुळे लोकप्रिय आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपुरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
विधानसभेवर निवडून गेलेल्या पाच विधान परिषद सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागांवर ही निवडणूक होत आहे. त्यापैकी नागपूरचे प्रवीण दटके एक आहेत. दटके यांच्या जागेवर संदीप जोशी येतील, अशी चर्चा होती. भाजपने जी तीन नावे दिल्लीत पाठवली होती, त्यात जोशी यांचे नाव नव्हते. त्यामुळे जोशी यांची संधी हुकणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, रविवारी जाहीर झालेल्या भाजपच्या यादीत जोशींचे नाव असल्याने त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. यापूर्वी जोशी यांना पदवीधर मतदारसंघातून भाजपने संधी दिली होती. ते पराभूत झाले होते.
संघ स्वयंसेवक म्हणून सामाजिक कार्याची सुरुवात करणारे जोशी २००२मध्ये सर्वप्रथम नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग तीनवेळा निवडून गेले. या काळात जोशींना दोनवेळा स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. महापलिकेच्या इतिहासात दोनदा हे पद भूषवणारे ते पहिलेच नगरसेवक ठरले होते. याच काळात त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासमध्ये विश्वस्त म्हणून कार्य केले होते. २०१७ ते २०२० या काळात ते महापालिकेत सत्तापक्ष नेता होते. जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष ही जबाबदारीही सांभाळली. २०२०-२१ या काळात ते महापौरपदी होते. फडणवीस उपमुख्यमंत्री असताना जोशी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयाचे मानद सचिव म्हणून जबाबदारी होती. २०२०मध्ये विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाकडून जोशी यांना उमेदवारी मिळाली होती. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी त्यांचा पराभव केला होता. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पक्षाला पहिल्यांदाच पराभव स्वीकारावा लागला होता.
संदीप जोशी यांनी राजकारणाबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम आयोजित करीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक म्हणून त्यांनी आतापर्यंत यशस्वीपणे आयोजन केले आहे. याशिवाय, त्यांच्या पुढाकारातून इतर अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यात येते. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी दीनदयाल थाळीचा उपक्रम त्यांनी सुरू केला. केवळ दहा रुपयांत दररोज उत्तम दर्जाचे अन्न देण्यात येते. गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे २० लाखांहून अधिक लाभार्थी ठरले आहेत.