नागपूर प्रतिनिधी :
दि. १९ मार्च २०२५
नागपूरमधील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी दंगलीचा सूत्रधार फहीम खानला बेड्या ठोकल्या आहेत. फहीम खानने मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी)चा शहराध्यक्ष आहे. पोलिसांनी त्याला बुधवारी अटक करुन कोर्टासमोर हजर केले. त्याला शुक्रवार २१ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे तपास यंत्रणेला अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
नागपुरच्या महाल परिसरात सोमवारी सायंकाळी हिंसाचार उफाळून आला. रात्री नऊ वाजतानंतर तीव्रता वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात होईपर्यंत शेकडो तरुणांनी मध्य नागपुरातील भालदारपूरा, हंसापूरी व अन्य भागात वाहनांची जाळपोळ करून घरांवर दगडफेक केली. हातात लाठ्या, काठ्या व शस्त्र घेऊन घोषणा देत तरुण रस्त्यावर उतरले होते. जमावाने पोलिसांवरही हल्ला करून गंभीर जखमी केले. महिला पोलिसांचा विनयभंग केला.
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने सोमवारी औरंगाजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आल्यानंतर त्याचे पडसाद सायंकाळी उमटले. या हिंसाचारानंतर शहरातील अकरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लावण्यात आली. मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहिम खान ए-६१, संजय बाग कॉलनी, डॉ. आंबेडकर मार्ग येथील रहिवासी आहे. पक्षाकडून त्याने वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणूक लढली होती. त्याला १ हजार ७३ मते मिळाली. त्याने शिवाजी नाईट शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्याच्याकडे पॅन कार्ड आहे पण आयकर भरण्याइतके उत्पन्न नाही. निवडणुकीच्यावेळी २५ हजार रोख होती. दुचाकी ॲक्टिव्हा असून दागिने, मालमत्ता वा शेती नाही.
धर्माचा आधार घेत फहीमने कट्टर विचारसरणीच्या तरुणांना एकत्र केले. प्रक्षोक्षक भाषणे देऊन जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्यामुळेच हिंसाचार झाला असून हा कट आधीच रचण्यात आला होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे.