नागपूर प्रतिनिधी :
दि. १९ मार्च २०२५
नागपूर हिंसाचार प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल ८० जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणातील कथित मास्टरमाईंडचं नाव समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमागे फहीम शमीम खान या व्यक्तीचा हात आहे. पोलिसांनी फहीम खानला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये फहीम खानने जमाव जमवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष असल्याची माहिती आहे.
नागपूर पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी ५१ जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये फहीम खानचं नाव आघाडीवर आहे. त्यानेच सोमवारी सकाळी ११ वाजता ३०-४० जणांना जमा केलं होतं. त्यानंतर त्यानेच पोलिसांना विहिंप आणि बजरंग दलाविरोधात निवेदन दिलं. पोलिसांनी याबाबत गुन्हाही दाखल केला होता. मात्र, संध्याकाळी फहीम खानने पुन्हा जमाव जमवला आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या हिंसाचारात फहीम खान मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे
फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष आहे. ३८ वर्षीय फहीम खानचं शिक्षण १० वीपर्यंत झाले आहे. फहीम खान पूर्वीही राजकारणात सक्रिय होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत फहीम खान नितीन गडकरीविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. फहीम खानवर नागपुरात हिंसा भडकवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फहीम खानने अलीकडेच झालेल्या निदर्शनांदरम्यान भडकाऊ वक्तव्यंही केली, ज्यामुळे परिस्थिती तणावग्रस्त झाली. साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानुसार, फहीम खानने निदर्शकांना सांगितले की, पोलीस हिंदू समाजातील आहेत. ते आपली मदत करणार नाहीत. या वक्तव्यांमुळे आंदोलन अधिक चिघळले आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुरावे आढळल्यास फहीम खान याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.