मुंबई प्रतिनिधी :
दि. २४ मार्च २०२५
रविवारी मुंबईतील एका शोमध्ये कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर #kunalkamra ट्रेंड होत असून, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते आहे. कॉमेडियनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तिखट शब्दात फटकारले. त्याने कॉमेडी सेटमधील एका विडंबनात्मक गाण्याचा व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आणि ज्याठिकाणी त्याने ही कविता सादर केली होती, त्या स्टुडिओचीही तोडफोड त्यांनी केली. कुणालने त्याच्या स्टँड-अप शो दरम्यान, ‘दिल तो पागल है’ मधील एका गाण्याचे विडंबन करुन शिंदेंचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला होता आणि त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला.
कुणाल कामराचा जन्म ३ ऑक्टोबर १९८८ रोजी झाला आणि तो व्यवसायाने एक स्टँडअप कॉमेडियन आहे. राजकीय विषयांवर त्याने केलेली स्टँडअप कॉमेडी अनेकदा चर्चेत आली आहे. कुणालने वाणिज्य शाखेत पदवी मिळविण्यासाठी जय हिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, पण त्याने दुसऱ्या वर्षातच महाविद्यालयाला राम राम केला. त्यानंतर तो प्रसून पांडेंची जाहिरात चित्रपट निर्मिती संस्था ‘कॉर्कोइस फिल्म्स’मध्ये निर्मिती सहाय्यक म्हणून काम करू लागला. त्याठिकाणी तो ११ वर्षे कार्यरत होता.
२०१३ मध्ये मुंबईतील कॅनव्हास लाफ क्लबमध्ये एका कार्यक्रमाद्वारे त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून सुरुवात केली. २०१६ साली त्याच्या एका शोची क्लिप YouTube वर व्हायरल झाली होती, ज्यामुळे त्याला जीवे मारण्याची धमकीही मिळाली. त्याने हा व्हिडिओ सरकारवर उपहासात्मक टीका करत नोटबंदीवर भाष्य केले होते. जुलै २०१७ मध्ये त्याने रमित वर्मासोबत ‘शट अप या कुणाल’ हा टॉक-शो सुरू केला. यामधीलही अनेक क्लिपमुळे वाद निर्माण झाला आहे.
कुणालच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्टनुसार त्याची एकूण संपत्ती सुमारे २ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १७ कोटी रुपये आहे. कॉमेडी विश्वात त्याने संपादन केलेल्या यशाच्या माध्यमातून कुणालने ही संपत्ती कमावली आहे. त्याची एकूण संपत्ती स्टँडअप कॉमेडी टूर्स, सोशल मीडिया आणि ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टमधून येते.
कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्याठिकाणी हा व्हिडिओ शूट करण्यात आला त्या ‘द हॅबिटॅट’मध्ये जाऊन तोडफोड केली. याप्रकरणी कुणालविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.